आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MCA Entrance Exam Confusion Issue At Nashik, Divya Marathi

एमसीए प्रवेश परीक्षेत गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- डीटीईमार्फत घेतलेल्या एमसीए (मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर अँप्लिकेशन) प्रवेश परीक्षेत रविवारी संदीप फाउंडेशनमध्ये प्रचंड गोंधळ झाला. दोन सत्रांतील या परीक्षेत पहिल्या सत्रातील पेपरच्या 75 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. दुसर्‍या सत्रातील पेपरही होऊ न शकल्याने विद्यार्थ्यांनी नियोजनाबाबत नाराजी व्यक्त करत आयोजकांचा निषेध केला. दरम्यान, डीटीईच्या संचालकांनी पुन्हा परीक्षा घेण्याचे आश्वासन दिले आहे.

डीटीईकडून परीक्षा घेण्याची जबाबदारी टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सवर्ि्हसेस) या कंपनीवर सोपवली आहे. एमसीएसाठी घेण्यात येणार्‍या सीईटी (प्रवेश) परीक्षेस सकाळी 9.15 वाजता पहिल्या सत्रातील पेपरसाठी विद्यार्थी वेळेतच परीक्षा केंद्रावर हजर होते. मात्र, परीक्षा आयोजकांनी त्यांच्याकडून मूळ ओळखपत्राची झेरॉक्स प्रत मागितली. छायांकित प्रत नसल्याने या विद्यार्थ्यांनी ‘मूळ प्रत घ्या आणि पेपर लिहू द्या’ अशी विनंती केली. मात्र, आयोजकांनी ही विनंती न ऐकल्याने प्रचंड गोंधळ झाला. पहिल्या पेपरला 546 पैकी 75 विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. दुसर्‍या सत्रातही 546 विद्यार्थ्यांचा 1.15 वाजेचा पेपर गोंधळामुळे होऊ शकला नाही.

संदीप फाउंडेशन केंद्रावरील सहाशेहून अधिक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष खंडेराव मेढे, जिल्हाध्यक्ष अजिंक्य गिते, सरचिटणीस कैलास खांडबहाले, जय कोतवाल, बाळा निगळ, चिन्मय देशपांडे, समाधान दातीर, मुकेश शहाणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट परीक्षा केंद्रावर हजेरी लावत हा विषय मार्गी लावण्यासाठी मध्यस्थी केली. याच वेळी पोलिसही आल्याने वातावरण काहीसे निवळले. परंतु, प्रश्न निकाली काढण्यासाठी मेढे यांनी तत्काळ डीटीईचे संचालक सु. का. महाजन यांच्याशी संपर्क साधत विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची विनंती केली. महाजन यांनी त्यास होकार देत केवळ संदीप फाउंडेशन केंद्रावरील विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर गोंधळ मिटला.

पुढील रविवारी परीक्षा नको..
परीक्षेसाठी 24 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करावयाचे होते. त्यानंतर 18 मार्चपासून हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यासाठी परीक्षा शुल्कही घेण्यात आले असून, परीक्षा देता आली नाही, तर पैसेही गेले आणि भविष्यही धोक्यात आले, अशी भावना काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. शिवाय पुढील रविवारी परीक्षा न घेण्याचीही विनंती काही विद्यार्थ्यांनी या वेळी केली.