आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळढोक अभयारण्यातील मुरूम उपशाचे मोजमाप सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - माळढोक पक्षी अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्रातील अनधिकृत पद्धतीने मुरूम उपसण्यात आलेल्या जमिनीच्या मोजणीला बुधवारी सुरुवात झाली. कोल्हापूर येथून खास मागवण्यात आलेल्या टोटल स्टेशन मशीनद्वारे ही मोजणी होत आहे. संगणकीकृत यंत्रामुळे किती क्षेत्रातील मुरूम उचलला, खोदलेल्या खड्डय़ांची जमिनीपासूनची खोली, किती ब्रास मुरूम उचलण्यात आला, हे स्पष्ट होणार असून त्या क्षेत्राचा नकाशा, अचूक क्षेत्र कळणार आहे.
पहिल्याच दिवशी गुळवंची-कोंडी रस्त्यालगतची मुरूम उपसण्यात आलेली पाच ठिकाणे व दगडांच्या चार खाणींची मोजणी करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे, तहसीलदार अंजली मरोड यांनी दुपारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासाठी प्रामुख्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील केगाव, कोंडी आणि अकोलेकाटी परिसरातील वनजमिनीतून मोठय़ा प्रमाणावर अवैध मुरूम उपसा केला आहे. अभयारण्य परिक्षेत्रात उत्खननास बंदी असताना अधिकार्‍यांनी परवानगी दिली कशी? कोणत्या नियमान्वये तेथील रॉयल्टी भरून घेतली? जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीचा आदेश दिला. त्यानुसार प्रांताधिकारी डॉ. विजयकुमार देशमुख यांनी तहसीदारांना चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश दिला. त्यास महिन्याचा कालवधी लोटला असून अधिकार्‍यांमधील शीतयुद्धाचा फटका चौकशी प्रकरणाला बसल्याचे चित्र आहे.
दोन पथकाद्वारे मोजणी सुरू: कोल्हापूर येथून मागवण्यात आलेल्या यंत्राद्वारे मुरूम उपसलेली जमीन व त्याहद्दीतील दगड खाणींची मोजणी सुरू आहे. भूवैज्ञानिक, भूमापन सहाय्यक दत्तात्रय मोरे, अविनाश कांबळे यांच्या पथकाने बुधवारी दिवसभरात कोंडी शिवारातील चार दगड खाणींची मोजणी केली. तर, अविनाश गोवे यांच्या पथकाने मुरूम उपसलेल्या जमिनीची मोजणी केली. कोंडी-गुळवंची रस्त्यालगत मुरूम उपसलेल्या 30 ते 40 एकर जमिनीची मोजणी झाली. त्या परिसरातील तलाठी, कोतवाल व मंडल अधिकार्‍यांचे पथक त्यांच्या मदतीला आहे.

मुरूमाऐवजी दगड खाणीला प्राधान्य
संबंधित ठेकेदाराने कोंडी, कारंबा, अकोलेकाटी शिवारातील सुमारे अडीचशे हेक्टर क्षेत्रावरील मुरूम उपसला आहे. त्याबाबतची चौकशी सुरू असल्याने प्राधान्याने त्याबाबतची मोजणी करण्याऐवजी भूमापन पथकाने दगड खाणींच्या मोजणीला विशेष महत्त्व दिले. मुरूम उपसा क्षेत्राची मोजणी करणार्‍या यंत्राची बॅटरी संपल्याने फारच कमी क्षेत्राची मोजणी झाली. दगड खाणींची मोजणी आवश्यक आहेच. पण, मुरूम उपशाची चौकशी सुरू असल्याने त्यास प्राधान्य देण्याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा मूळ विषय बाजूला पडण्याची शक्यता आहे.

वन विभागाला सहभागी करा
माळढोक पक्षी अभयारण्याच्या परिक्षेत्रातील मुरूम उपसलेल्या जमीन मोजणीच्या घटनास्थळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे, तहसीलदार अंजली मरोड यांनी भेट देऊन पाहणी केली. वनविभागाच्या अधिकार्‍यांना मोजणीत सहभागी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यंत्राद्वारे मोजणी होत असल्याने त्यामध्ये अचूकता असून नकाशा त्वरित निघणार आहे. त्यामुळे किती क्षेत्रातील मुरूम उपसला, हे स्पष्ट होईल. दगड खाणींची मोजणी सुरू असून खाण मालकांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. क्षेत्र भरपूर असल्याने चार ते पाच दिवसांमध्ये मोजणी पूर्ण होईल. त्यानंतरच नकाशासह संपूर्ण अहवाल तयार होईल. हा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.’’ अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी