नाशिक - छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण आयुष्यच इतके संघर्षमय आहे की, या व्यक्तीविषयी लिहिण्याचा मोह होताच. दुसरी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांविषयी अमराठी समाजात कमी माहिती असल्याने या व्यक्तीचे महान कार्य अशा समाजापर्यंत पोहोचण्याची गरज होती म्हणून त्यांच्यावर ‘शिवाजी - चॅलेंजिंग डेस्टिनी’ ही चरित्रमय कादंबरी लिहिली, असे मेधा देशमुख - भास्करन यांनी ‘दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल’मध्ये सांगितले.
या साहित्य उत्सवात ‘डीबी डिजिटल’ व ‘दिव्य मराठी डाॅट काॅम’चे हेड अनुज खरे अाणि दीप्ती राऊत यांनी मेधा देशमुख-भास्करन यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांनी
आपल्या साम्राज्याचा विस्तार करताना प्रत्येकाला आपापल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार दिला होता. जाती-धर्मामध्ये त्यांनी कधीही दुजाभाव केला नाही. त्याचबराेबर महिलांचे संरक्षणही महत्त्वाचे मानले. औरंगजेबाच्या धर्मांध धोरणाला प्रत्युत्तर देताना मुस्लिम धर्माचा अवमान केला नाही. त्यांना आपल्याच साम्राज्यातील वतनदार, जहागिरदारांशी सर्वच पातळ्यांवर संघर्ष करावा लागला. अशा राजाचे कर्तृत्व अद्वितीय होते, असेही त्या म्हणाल्या. रोटी, कपडा, मकान व स्वाभिमान हे शिवाजी महाराजांच्या धोरणाचे स्वरूप होते. आपल्या सैन्याची नव्याने बांधणी करताना त्यांनी मुघलांची मनसबदारी पद्धत मोडीत काढून सरनौबत ते बारगीर-शिलेदार अशी नवी रचना अस्तित्वात आणली आणि सरकारी तिजोरीतून सैन्याचा खर्च करण्यास सुरुवात केली ही रचना क्रांतिकारी असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.
‘शिवाजी : चॅलेंजिंग डेस्टिनी’चे वैशिष्ट्य असे...
या पुस्तकात लेखिकेने त्यावेळच्या आर्थिक घडामोडी दाखवताना एक्सेल ग्राफचा, डॉलर्सचा वापर केला आहे. अमराठी वाचकांना शिवाजी महाराजांचे शौर्य कळावे म्हणून ओसामा बिन लादेनची हत्या व शाईस्तेखानाचा हल्ला यांच्यात साम्यही दाखवले आहे.
‘शिवाजी : चॅलेंजिंग डेस्टिनी’ ठरला क्रॉस वर्डमध्ये लोकप्रिय
मूळच्या मराठी असलेल्या मेधा देशमुख या दुबईतील ‘खिलजी टाइम्स’मध्ये आरोग्यविषयक लिखाण करत होत्या. शिक्षण मायक्रो बायोलॉजीमध्ये झाल्याने त्यांनी या विषयावर विपुल लेखन केले होते. पण, शिवाजी महाराजांवरच्या आत्मीयतेतून त्यांनी हे पुस्तक लिहायला सुरुवात केली. सध्या या पुस्तकाने ‘नॉन फिक्शन’ वर्गवारीत क्रॉस वर्ड दुकानांच्या साखळीतील पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.