आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Medical And Drugs Shops To Go To Strike On 16 Dec.

औषध विक्रेत्यांचा 16 पासून तीन दिवस बंद, अन्न व औषध प्रशासनाच्या बेकायदेशीर कारवाईस विरोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने औषधे विक्रे त्यांविरोधात बेकायदेशीर कारवाई केली जात असून, त्याविरोधात राज्यभरातील किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांनी 16, 17 ते 18 डिसेंबर या कालावधीत तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर 18 तारखेला राज्यभरातील सुमारे 20 हजार विक्रेत्यांचा विधिमंडळावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी पत्रकाद्वारे सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील सुमारे चार हजार औषध विक्रेते या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा दावा डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने नितीन देवरगावकर, योगेश बागरेचा यांनी केला आहे. एमएससीडीएशी संलग्न असलेल्या संघटनेकडून अांदोलनात उतरणार आहे. नाशिक विभागासह राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाकडून किरकोळ कारणांसाठी परवाने रद्द करणे, तत्काळ खरेदी-विक्री बंदी करण्यासारख्या अतिरेकी कारवाया करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासंदर्भात, संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने दिलेल्या निकालाकडेही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत मुख्यमंत्री, अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी वारंवार निवेदन, भेटी घेऊनही समाधानकारक तोडगा निघालेला नाही. तसेच, कायद्याची अंमलबजावणी करताना जनतेच्या जिवाशी थेट खेळणार्‍या आणि त्यांचे जीव धोक्यात आणणार्‍या आरोग्य सेवा, बोगस डॉक्टर यांच्याकडे डोळेझाक केली जात आहे.
मात्र, शासन आणि ग्राहकांची दिशाभूल करीत प्रशासनाकडून केमिस्टच्या बदनामीचा घाटच घातला जात असल्याचेही पत्रकात म्हटले आहे. प्रशासनाच्या जाचक कारवाईमुळे शेकडो औषध विक्रेत्यांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली. या काळात मधुमेही, हृदयरोगाच्या रुग्णांनी औषधांचा तुटवडा भासू नये, याकरिता अगोदरच मुबलक साठा करून घेण्याचे आवाहनही पदाधिकार्‍यांनी केले आहे.
प्रशासनाच्या दमबाजीलाच ‘केमिस्ट’चा विरोध
केमिस्ट असोसिएशनने आंदोलनाचे हत्यार उपसताच प्रशासनाकडून लागलीच ग्राहकांना अत्यावश्यक वेळेत औषधे न भेटल्यास अथवा गैरसोय झाल्यास थेट परवाने रद्द करण्याची एकप्रकारे दमबाजीच करण्यात आली आहे. याविरोधातच संघटना एकजुटीने आंदोलन करणार आहे. या काळात ग्राहकांची कुठलीही अडचण होणार नाही, यासाठी केमिस्ट भवन, गोळे कॉलनी येथे स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. - योगेश बागरेचा, नाशिक डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असो.