आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय, अभियांत्रिकीचे भरावे लागणार पूर्ण शुल्क

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- केंद्र शासनाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशशुल्क माफीसाठी सहा लाख रुपये उत्पन्नाची केलेली र्मयादा राज्य शासनाने लागू न करता दोन महिन्यांतच नवे परिपत्रक काढत ती साडेचार लाख रुपये केली. त्यामुळे जून महिन्यात माफी शुल्कासह प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवर 31 ऑगस्टनंतर पूर्ण शुल्क भरण्याची वेळ आली असून, शासनाचीच दुटप्पी भूमिका विद्यार्थ्यांच्या मुळावर आल्याची प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
केंद्र शासनाने सहा लाख रुपये उत्पन्न र्मयादेचे 24 जून 2013 रोजी स्पष्ट आदेश दिले असतानाही 31 ऑगस्ट 2013 रोजी राज्य शासनाने शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांची उत्पन्न र्मयादा चार लाख 50 हजार एवढीच केली. विशेष म्हणजे, 24 जूनच्या निर्णयानुसार बहुतांश विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशही घेतले. मात्र, दोनच महिन्यांत त्यांना आता सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शुल्कानुसार पूर्ण शुल्क भरण्याची वेळ आली आहे. त्यानुसार, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांकडून उर्वरित शुल्काची मागणी केली आहे. काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सूचित केले आहे, तर काहींना मात्र शुल्क न भरल्यास प्रवेश रद्दचाही इशारा दिला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू झाली आहे. अर्थात महाविद्यालयांनाही नियमानुसार शुल्क घ्यावेच लागणार असून, शासनाकडून त्यात सूटच मिळणार नसल्याने त्यांनी त्याची मागणी करणे साहजिकच आहे. त्यामुळे पालकांनीही महाविद्यालयांना कुठलाही दोष न देता राज्य शासनाच्याच आदेशाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
अनेकांना रद्द करावे लागणार प्रवेश मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शासनाच्या सवलतीच्या बळावर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभयासक्रमासाला प्रवेश घेतले आहेत. मात्र, आता अचानक सर्वच शुल्क कसे भरणार आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे प्रवेश रद्द करण्याची वेळ आली असून, इतरत्रही प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच असल्याने या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याचेही संकट ओढावले आहे.
सर्वसाधारण वर्गाचे शुल्क भरणे अशक्य
माझा पाल्य अभियांत्रिकी पदवीच्या प्रथम वर्षाला आहे. त्याला सवलतीच्या दरात 16 हजार रुपयांत प्रवेश मिळाला. परंतु, शासनाने बदललेल्या या भूमिकेमुळे आता सर्वसाधारण वर्गाचे 96 हजार रुपये म्हणजे जवळपास 80 हजार रुपयांचे अधिक शुल्क भरावे लागणार आहे. तेवढी माझी परिस्थिती नाही. शिवाय, या वर्षी महाविद्यालय सहकार्यही करेल. पण, पुढील वर्षी दोन्ही वर्षाचे एकत्रित म्हणजे दोन लाख रुपये मला भरणे अशक्य आहे.
-सुनील कांगणे, पालक