आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Medical Collage Start In Nashik Corporation Hospital

नाशिकमधील महापालिका रुग्णालयांत होणार वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयासह इंदिरा गांधी रुग्णालयात वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे, असा प्रस्ताव मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. या प्रस्तावाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मंजुरी मिळाली असून, महापालिका आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

महापालिका रुग्णालयांच्या तुलनेत तज्ज्ञ डॉक्टरांना खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या रकमेचे मानधन मिळते. त्यामुळे त्यांच्याकडून खासगी रुग्णालयात नोकरी करण्यास प्राधान्य दिले जाते. परिणामी, महापालिका रुग्णालयांना तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासते. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये चार ते पाच तासांच्या ड्यूटीसाठी डॉक्टरांना दीड ते दोन लाख रुपये मानधन मिळते. महापालिकेकडून मात्र ५५ ते ६० हजार रुपयांचे मानधन मिळते. या तफावतीमुळे महापालिका रुग्णालयांत काम करण्यास डॉक्टर तयार होत नाहीत. त्यामुळे अशा तज्ज्ञांची जागा भरून काढण्यासाठी हा प्रस्ताव देण्यात आला आहे.

सध्या महापालिकेकडे फक्त तीन ते चार फिजिशियन आहेत. रेडिओलॉजिस्ट, सर्जन, आॅर्थोपेडिकसह इतर महत्त्वाची पदे रिक्त आहेत. महापालिका रुग्णालयांत बाल, स्त्रीरोग, भूलतज्ज्ञ, जनरल फिजिशियन, अस्थिरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ यांचीही कमतरता आहे.

सुविधा मिळण्यास मदत
^डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयासह शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांत डॉक्टरांची कमतरता आहे. या रुग्णालयांत डॉक्टर उपलब्ध व्हावेत म्हणून वैद्यकीय प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे देण्यात आला होता. त्यास मंजुरी मिळाली असून, लवकरच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडेही प्रस्ताव देण्यात येणार आहे. या केंद्रामुळे नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. डॉ.राजेंद्र भंडारी, मुख्यवैद्यकीय अधिकारी

रुग्णालयात येणार हायटेक यंत्रणा
आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात इंदिरा गांधी रुग्णालयात फिजिशियन, सर्जन, ऑर्थोपेडिक्स, न्यूरो सर्जन असे विशेष तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध व्हावेत म्हणून संबंधित प्रस्ताव देण्यात आला आहे. याबरोबरच रुग्णालयात हायटेक यंत्रणादेखील उपलब्ध होणार आहे.
करारावरील डॉक्टरांचा मिळणार आधार...
वैद्यकीय महाविद्यालयांतून अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणाऱ्यांना किमान एक वर्ष शासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयांमध्ये काम करणे बंधनकारक आहे. त्यांच्याकडून तसा करार लिहून घेतला जातो. वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यास असे बाँडवरील डॉक्टर महापालिकेच्या अन्य रुग्णालयांना उपलब्ध होऊन तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता काहीअंशी भरून निघण्यास मदत होऊ शकेल. जुने नाशिक परिसरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, असा प्रस्ताव मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्र सुरू केल्यास आगामी सिंहस्थात येणाऱ्या भाविकांसह या भागातील नागरिकांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.