आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Medical Officer Slap To Cleanser At Yewola Rural Hospital

वैद्यकीय अधिकार्‍याकडून सफाई कामगारास मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला - आजारी असल्यामुळे शनिवारपासून दोन दिवस कामावर नसलेला सफाई कामगार सोमवारी कामावर हजर होताच ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याला शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार काही कामगारांनी वैद्यकीय अधीक्षकांकडे केली आहे. यामुळे संतप्त कामगारांनी मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

येवला ग्रामीण रुग्णालयातील सफाई कामगार रफिक शेख हा आजारी असल्याने गैरहजर होता. सोमवारी शेख कामावर हजर झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी जुन्नरे यांनी शेख या कामगारास शिवीगाळ व मारहाण केली, अशी तक्रार शेख यांच्यासह कंत्राटावर असलेल्या काही सफाई कामगारांनी वैद्यकीय अधीक्षकांकडे केली आहे. डॉ. जुन्नरे हे सफाई कामगारांना नेहमी अरेरावीची भाषा वापरतात. शिवीगाळ करून त्रास देतात, असे सफाई कामगारांनी तक्रारीत म्हटले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभाराविरोधात ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. बी. माले यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून माहिती दिली. यावर डॉ. माले यांनी वैद्यकीय अधीक्षकांकडे लेखी तक्रार देण्यास सांगितले. मात्र अधीक्षक डॉ. सदावर्ते हे १४ नोव्हेंबरपासून रजेवर असल्याने सफाई कामगारांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्याकडे डॉ. जुन्नरे यांच्याविरोधात लेखी तक्रार दिली.
तक्रारीवर सफाई कामगार रफीक शेख, विनोद छजलानी, अशोक कांबळे, हिरामण गांगुर्डे, रुपेश पगारे, संजय भोरकडे आदींच्या सह्या आहेत.

सर्व आरोप खोटेच
सदरच्या सफाई कामगारास शिवीगाळ व मारहाण केलेली नाही. त्याचे आरोप खोटे आहे. हजेरीपत्रकावरून सफाई कामगारांची नियमितता दिसून येते. त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत असल्याने माझ्यावर खोटेच आरोप केले जात आहे.
- डॉ. प्रशांत जुन्नरे, वैद्यकीय अधिकारी

व्यवस्था कोलमडली
ग्रामीण रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी कंत्राटावर असलेल्या सफाई कामगारांनी अचानक काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने रुग्णालयातील अंतर्गत स्वच्छता कोलमडली होती.