आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषध विक्रेत्यांचा बंद, शहराला गुंगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेला शुक्रवारचा एक दिवसीय बंद शहर आणि जिल्ह्यात शंभर टक्के यशस्वी झाला. केंद्र सरकारचे जाचक धोरण आणि थेट विदेशी गुंतवणूकीला विरोध करण्यासाठी केलेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील साडेचार हजार व्यावसायिकांनी सहभागी नोंदविला. गोळे कॉलनीतील केमिस्ट भवनपासून अन्न औषध प्रशासन कार्यालयावर मूकमोर्चा काढून विभागाचे सहआयुक्त निनावे यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, या बंदमुळे जिल्ह्यात औषध विक्रीतून दैनंदिन होणारी 25 कोटींची उलाढाल ठप्प झाली.

औषध व्यावसायिकांवर अनेक कायद्यांच्या माध्यमातून होणार्‍या अन्यायाविरुद्ध सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. प्रत्येक दुकानात नोंदणीकृत केमिस्ट असावा, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्याच्या पूर्तीसाठी वर्षभराचा अवधी देण्यात यावा. डीपीसीओअंतर्गत आणलेल्या 348 औषधांच्या किंमती सरकार कमी करत आहे, त्याला विरोध नाही मात्र या औषधांसाठी म्हणून वितरकाला मिळणारा नफा कमी केला जाईल. याला विरोध व शासकीय स्तरावर व्यवसायाच्या संबंधित निर्णयांत केमिस्टलाही सहभागी करून घ्यावे, या मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात असल्याचे जिल्हाध्यक्षनितीन देवरगावकर यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले यावेळी, रत्नाकर वाणी, योगेश बागरेचा, मयूर अलई, जगदीश भोसले, मनोज लोढा, नीलेश अग्रवाल, राजेंद्र धामणे आदी उपस्थित होते.

असोसिएशनचा मदतीचा दावा फोल
औषध विक्रीची दुकाने बंद असल्याचा फटका रुग्णांना बसू नये यासाठी असोसिएशनचे कार्यालय असलेल्या गोळे कॉलनीतील केमिस्ट भवन येथील 0253- 2318187, 2573874 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यास, रुग्ण ज्या परिसरात आहे तेथील औषध विक्रेत्यांला रुग्णाची माहिती देऊन औषध उपलब्ध करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती असोसिएशनने दिली होती. मात्र ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने दिवसातून तीन वेळा या क्रमांकांवर संपर्क साधला असता 2318187 हा क्रमांक उचललाच जात नव्हता, तर 2573874 हा क्रमांक टेम्पररी आउट ऑफ सर्व्हिस येत होता. त्यामुळे दिवसभरात याचा रुग्णांना फायदा झालाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.