आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषध विक्रेत्यांच्या उपोषणास प्रारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - औषध विक्रेत्यांवर सातत्याने होणार्‍या अयोग्य कारवाईसाठी नाशिक केमिस्ट असोसिएशनतर्फे अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयासमोर पुकारलेल्या साखळी उपोषणास सोमवारपासून प्रारंभ झाला. जिल्हाभरातून आलेल्या 300हून अधिक औषध विक्रेत्यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या साखळी उपोषणापासून राज्य संघटना मात्र अद्याप अलिप्त असून, आंदोलनाकडे औषध विक्रेत्यांचे लक्ष लागलेले आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या जाचक कारवाईमुळे औषध विक्रेत्यांचा व्यवसायच अडचणीत सापडला आहे. या विभागाकडून होत असलेल्या जाचक कारवाईमुळे औषध विक्रीसंबंधीच्या कायद्याचीदेखील पायमल्ली होत असल्याचा आरोप या संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या साखळी उपोषणात जिल्हाभरातून औषध विक्रेते सहभागी झाले होते. तसेच मंगळवारपासून शहर व जिल्ह्यातून दररोज नवीन सभासद या साखळी उपोषणात सहभागी होणार आहेत. दरम्यान, औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाची तीन ते चार दिवसांत दखल घेतली न गेल्यास बेमुदत दुकाने बंद किंवा केवळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेतच दुकाने सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वेळी अतुल अहिरे, सुरेश पाटील, योगेश कदम, संदीप शेवाळे, नितीन औटी, प्रशांत पवार, महेश भावसार, संतोष पाटील, हिरालाल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हा आहे जाच..
अन्न आणि औषध विभागाच्या वतीने कोणतेही कारण नसताना नाशिक शहरासह जिल्ह्यातील त्याच त्या औषध दुकानांची महिन्यातून पाच ते सात वेळा तपासणी केली जाते. किरकोळ कारणासाठी दुकानाचा परवाना केवळ काही दिवसांसाठी निलंबित करण्याची तरतूद असताना तो थेट रद्दच केला जातो. यामुळे जाच होत आहे.