आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानसोपचाराचे टॉनिक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नाशिक - वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढते नैराश्याचे प्रमाण पाहता, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मानसोपचारतज्ज्ञ नेमण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर नाशिकसह नगर जिल्ह्यातील 13 महाविद्यालयांत हा ‘पायलट प्रोजेक्ट’ राबविला जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी केली जाईल.
वाढत्या स्पर्धेत अपेक्षांची पूर्तता करू न शकल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक असल्याचे अनेक घटना आणि संशोधनातून समोर आले आहे. वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना ही समस्या अधिक भेडसावत असल्याने आरोग्य विज्ञान विद्यापीठ राज्यात जिल्हानिहाय मानसोपचारतज्ज्ञांची नेमणूक करणार आहे. कुठल्या विद्यार्थ्याला समुपदेशनाची आवश्यकता आहे, याची माहिती संबंधित संस्था, शिक्षक किंवा महाविद्यालयालाच असू शकते. त्यामुळे उपचारार्थी विद्यार्थ्यांची नावे संबंधित संस्थेकडून मागविण्यात येणार आहे.

नावे गुप्त ठेवणार
नकारात्मकता आलेल्या विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोनही नकारात्मकच असतो. त्यामुळे विद्यार्थी अधिकच नैराश्याच्या गर्तेत जाण्याची शक्यता असल्याने संबंधित विद्यार्थ्याचे नावही गुपित ठेवले जाणार आहे.
तीन तज्ज्ञांचे पथक
तीन- तीन तज्ज्ञांच्या पथकांची नेमणूक केली जाणार असून, महाविद्यालयांची आणि विद्यार्थ्यांची संख्या पाहता, जिल्ह्यात किमान एकतरी मानसोपचार प्रतिनिधी असावा, असा विचार सुरू आहे. नाशिक, मुंबई व पुणे या जिल्ह्यांत त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
संपूर्ण राज्यात योजना राबवणार
ही योजना ब-याच दिवसांपासून प्रस्तावित होती. मात्र, ती राबविली जात नव्हती. आता ती सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाने तीन दिवसांपूर्वीच घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात मानसोपचारतज्ज्ञांची नेमणूक करून योजना राबविली जाणार आहे. नाशिकसह नगर जिल्ह्यातून सुरुवात करत पुढे पुणे आणि नंतर राज्यात ही योजना सुरू केली जाईल.
- डॉ. अरुण जामकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ