आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘स्वस्त औषधे मेडिकल दुकानांत भरपूर उपलब्ध’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - केंद्र सरकारच्या ड्रग्ज प्राइज कंट्रोल ऑर्डर अंतर्गत 17 जून रोजी जाहीर केलेल्या 154 औषधी घटकद्रव्यांवर अवलंबून असलेली नव्या दरातील स्वस्त औषधे विक्रेत्यांपर्यंत गुरुवारी दिवसभर पोहोचविण्यात आल्याने ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. रुग्णांचे हाल होऊ नये याकरीता डॉक्टरांकडे रुग्णाने पर्यायी स्वस्त औषधांची मागणी केल्यास ती औषधे विक्रेते देऊ शकणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गोरख चौधरी यांनी केमिस्ट ड्रगिस्टच्या बैठकीत औषध विक्रेत्यांचे प्रबोधन करताना दिली.

स्वस्त औषधांबाबतच्या संभ्रमावस्थेबाबत चर्चा करण्यासाठी केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनकडून काका गद्रे मंगल कार्यालयात गुरुवारी दुपारी केमिस्ट महासभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात चौधरी मार्गदर्शन करीत होते.

सिप्ला या प्रमुख औषध कंपनीला न्यायालयाने 27 ऑगस्टपर्यंत औषधांच्या नव्या किंमती टाकून त्या बाजारात उपलब्ध करून देण्यास वेळ दिला असला, तरी कंपनीच्या बाजारात असलेल्या 47 पैकी 15 औषधे बाजारात उपलब्ध झाली आहेत. नाशिकस्थित ब्ल्युक्रॉस लॅबरोटरीज लिमिटेड या कंपनीने डीपीसीओ अंतर्गत येणारी शंभर टक्के औषधे नव्या दरात उपलब्ध करून दिली असून मॅनकाइंड फार्मा या कंपनीचीही सर्व औषधे उपलब्ध झाली आहेत. र्जमन रिमेडीज या कंपनीचीही काही उत्पादने नव्या दरात उपलब्ध झाली आहेत. स्वस्त दरातील औषधे पाहिजे असल्यास त्यांनी डॉक्टरांना तशी विनंती करावी व महागड्या औषधांना पर्यायी कंपनीची स्वस्त औषधे देण्याची विनंती केल्यास ही औषधे मिळू शकतील, असे चौधरी यांनी यावेळी स्पष्ट करतानाच रुग्णाचे हीत जपण्याचा सल्लाही विक्रेत्यांना दिला.

बैठकीस, संघटनेचे सचिव अनील कुंदे, सहसचिव अतुल जाधव, उपाध्यक्ष विजय आहेर, कैलास सूर्यवंशी, बद्रिनारायण काळे, अतुल अहिरे, संतोष पाटील, राहुल बच्छाव, देवीदास उदावंत यांसह मोठय़ा संख्येने केमिस्ट्सची उपस्थिती होती. राजेंद्र धामणे यांनी सूत्रसंचालन केले.

यामुळे अजून काही काळ लागणार
औषधांचे उत्पादन करणार्‍या 95 टक्के कंपन्या हिमाचल प्रदेशातील बद्दी, हरिद्वार या परिसरात आहेत. येथून देशभरात पोहोचविण्याकरीता नव्या दरातील औषधांचे ट्रक्स निघालेले असले, तरी उत्तरांचलमध्ये प्रचंड पाऊस असल्याने दळणवळणासाठी अडचणी येत आहेत. यामुळे ट्रक्स अडकून पडले असल्याने सोमवारपर्यंत सर्वच कंपन्यांची स्वस्त दरातील औषधे शहरात पोहोचू शकणार आहेत.