आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषध दुकाने आजपासून अर्धाच दिवस, केमिस्‍ट संघटनेचा निर्णय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज्‍यभरातील औषध विक्रीची दुकाने आजपासून सोमवार(दि. 24)पासून दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत. अन्न व औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईच्या जाचाला कंटाळून विक्रेते आपले परवाने राज्य शासनाला परत करणार आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून उत्स्फूर्तपणे हे आंदोलन केले जात आहे. केमिस्‍ट व ड्रगिस्‍ट संघटनेने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही संघटनेने आंदोलन केले आहे.

औषध विक्री व्यवसाय अन्न व औषध प्रशासन कायदा 1940 नियम 1945 अंतर्गत करण्यात येतो. या कायद्याचे पालन करीत औषध वितरण करताना अनेकदा समोर आलेल्या रुग्णाला प्राधान्य द्यावे लागते. प्रशासन मात्र मूळ व्यवस्थेकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करून औषध विक्रेत्यांना वेठीस धरत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. प्रशासनाकडून विक्रेत्यांना वेठीस धरले जात असून, राज्यात पाच हजारांवर सभासदांवर कारवाई केली आहे. या जाचाला कंटाळून तीन हजारांपेक्षा जास्त औषध विक्रेत्यांनी परवाने सरकारला परत केले तर राज्यातील 55 हजार विक्रेते 15 जुलै रोजी परवाने सरकारकडे जमा करणार आहेत. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सोमवारपासून र्मयादित काळाकरिताच दुकाने सुरू ठेवणार असल्याचे जिल्हाध्यक्ष नितीन देवरगावकर यांनी सांगितले.

रुग्णसेवा हे कर्तव्य
रुग्णसेवा हे आमचे कर्तव्य असून, त्यानुसारच काम होईल. संघटनेच्या निर्णयानुसार आंदोलन होत असून, जिल्ह्यातील सर्व दुकाने दुपारी 2 ते रात्री 10 या वेळेतच उघडी राहणार आहेत. औषध विक्रेत्यांचा हा उत्स्फूर्त निर्णय आहे. गोरख चौधरी, जिल्हाध्यक्ष, केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशन

दोन हजारांवर विक्रेत्यांचा सहभाग
जिल्ह्यातील चार हजार, तर शहरातील दोन हजारांवर औषध विक्रेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. रुग्णांना त्रास होणार नाही, याची पुरेपूर दक्षता संघटनेकडून घेतली जात आहे. किशोर बगदे, शहराध्यक्ष, नाशिक केमिस्ट असोसिएशन

रुग्णांकरिता हेल्पलाइन
ज्या रुग्णांना अत्यावश्यक औषधांची गरज असेल, त्यांच्याकरिता संघटनेकडून केमिस्ट भवन, गोळे कॉलनी येथे मदतकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. अत्यावश्यक औषधांकरिता 0253- 2318187 व 2573874 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे संघटनेने कळविले आहे.