आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील औषध विक्रेत्यांचे आंदोलन मागे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - औषध विक्रेत्यांकडून 15 जुलैपासून परवाना परत करण्याच्या दिशेने सुरू केलेले आंदोलन, या आंदोलनाचा भाग म्हणून ठोक औषध विक्रेत्यांनी 1 जूनपासून थांबविलेला औषध खरेदी आणि त्यातच सोमवारपासून अर्धा दिवस मेडिकल बंद ठेवण्यास झालेली सुरुवात यामुळे रुग्णांचे हाल सुरू झाले होते. अखेर मंगळवारी सायंकाळी मागण्यांबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखविलेल्या सकारात्मकतेमुळे बुधवारपासून आंदोलन मागे घेण्याची घोषणा केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट संघटनेने केल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

अन्न व औषध प्रशासनाने कायद्याचे उल्लंघन करणार्‍या औषध विक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली होती. त्यातच प्रशासनाची भूमिका अन्यायकारक असून, वास्तवात कायद्याचे पालन पूर्णत: होऊच शकत नसल्याचे केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट संघटनेचे म्हणणे होते. प्रशासन अरेरावी करीत बेकायदेशीर कारवाया करीत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी करून 15 जुलैपासून राज्यभरात परवाने परत करण्याबाबत आंदोलन पुकारले होते. मात्र, मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत संघटनेचे राज्याध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सचिव अनिल नावंदर, विनय र्शॉफ यांसह प्रमुख पदाधिकार्‍यांनी चर्चा केली. यात अनेक मागण्यांबाबत चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आल्याचा निर्णय घेतला असून, बुधवारी सकाळपासून रात्री 10 वाजेपर्यंत औषध दुकाने उघडी राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष नितीन देवरगावकर, सचिव बागरेचा यांनी सांगितले. दरम्यान, नाशिक जिल्हा केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष गोरख चौधरी यांसह पदाधिकार्‍यांनी दुपारी अन्न व औषध प्रशासनाचे सचिव महेश झगडे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी चर्चा केली.

बरे झाले आंदोलन मिटले
एक जूनपासून ठोक औषध विक्रेत्यांनी कंपन्यांकडून औषधांची खरेदी थांबविली होती, त्याचा परिणाम बाजारात किरकोळ औषध विक्रेत्यांना जाणवू लागला होता. अनेक औषधांच्या मागणीच्या तुलनेत 30 टक्के पुरवठा घटला असल्याने विपरीत परिणाम जाणवू लागला होता. दरम्यान, हे आंदोलन आणखी सहा दिवस चालले असते तर किरकोळ दुकानांतही औषधांचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे योग्य वेळी आंदोलन मिटल्याचे समाधान विक्रेत्यांनी व्यक्त केले.