आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवकांच्या कामांना १५ दिवसांत हिरवा झेंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘महासभेने मंजूर केलेले अंदाजपत्रक प्रत्यक्षात अंमलातच अाले नाही अन‌् गेल्या वर्षी संघर्ष करून मिळविलेल्या ५० लाख रुपये नगरसेवक निधीतील कामेही लालफितीत’ अशा काेंडीत सापडलेल्या नगरसेवकांच्या संयमाचा बांध अखेर शुक्रवारी (दि. २०) महासभेत फुटला. त्यांच्या अाक्रमक पवित्र्यापुढे प्रशासनाने माघार घेत पंधरा दिवसांत रखडलेल्या कामांची अंदाजपत्रके तयार करून कार्यारंभ अादेश देण्याची ग्वाही दिली. दरम्यान, भाजप नगरसेवकांनी काळ्या फिती लावून जाेरदार अांदाेलन केले, तर अायुक्त उत्तर देत नसल्यामुळे महापाैरांसमाेरील वेलमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र झाल्यामुळे काही काळ गाेंधळही उडाला.
महासभेच्या सुरुवातीलाच शिवसेनेचे नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी नगरसेवकांची कामे हाेत नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत थेट अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनाच विचारणा सुरू केली. पावसाळा संपला तरी गटारी साफ केलेल्या नाहीत. वास्तविक पावसाळ्यापूर्वी ही कामे हाेणे अपेक्षित हाेते. तसेच रस्त्यांचे झाले असून, खड्डे दुरुस्ती पावसाळा झाल्यानंतरही झालेली नाही. वालदेवीत शंभर टक्के सांडपाणी जात असून, प्रशासन बघूनही ढिम्मच असल्याची टीका केली. त्यानंतर सर्वच नगरसेवकांनी नगरसेवक निधीबाबत उभे राहून जाब विचारणे सुरू केल्यावर शिवसेनेचे गटनेते अजय बाेरस्ते रिपाइंचे गटनेते प्रकाश लाेंढे यांनी ५० लाख रुपयांच्या मागील काळात मंजूर झालेल्या कामांचे काय झाले, असा प्रश्न करून उत्तराची मागणी केली.
दरम्यान, भाजप गटनेते संभाजी माेरुस्कर यांनी तीन वर्षांपासून नगरसेवकांच्या फायली रखडल्याचा अाराेप करीत गेले वर्ष गेले अाता चालू वर्ष संपण्याची वेळ अाली, तरी अंदाजपत्रक नसल्यामुळे कामे कशातून करायची, असा सवाल केला. नगरसेवकांनी एकत्रितरीत्या महापाैरांच्या अासनासमाेर धाव घेऊन उत्तरासाठी अाग्रह धरल्यावर अखेर अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी १५ दिवसांंत अंदाजपत्रकातील कामांचे अंदाजपत्रक तयार करू, असे अाश्वासन दिले. स्मार्ट सिटी अपुऱ्या मनुष्यबळामुळे अधिकाऱ्यांवर कामाचा ताण येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, ही बाब लक्षात घेऊन तक्रार करावी, अशी विनंतीही त्यांनी केली.

स्मार्ट सिटीच्या नावाखाली होणाऱ्या अडवणुकीकडे लक्ष वेधण्यासाठी सभागृहात फलक झळकावताना भाजपचे नगरसेवक.

स्थायी समिती सभेत भाजपच्या नगरसेविका कामे रखडल्यामुळे अाक्रमक झाल्या हाेत्या. महासभेत भाजप नगरसेवकांनी काळ्याफिती, तसेच उपरणे डाेक्यावर बांधून प्रशासनाचा निषेध केला. नगरसेवकांची कामे रखडल्यामुळे ताेंडावर अालेल्या निवडणुकीत काय उत्तर द्यायचे, असा सवाल करीत प्रशासनाकडून जाणिवपूर्वक अडवणूक हाेत असल्याचा अाराेपही केला. भाजप नगरसेवकांनी स्मार्ट सिटीच्या नावाखाली कशा पद्धतीने अडवणूक हाेते यासंदर्भात लक्ष वेधण्यासाठी फलकही झळकावला. मात्र, महापाैरांनी तत्काळ ताब्यात घेण्याचे अादेश दिले.
४९० काेटींपैकी १८३ काेटींचीच कामे
नगरसेवक अाक्रमक झाल्यावर अायुक्तांनी कामांची यादी सादर केली. त्यात ४९० काेटी रुपयांची कामे प्रस्तावित असून, त्यापैकी १८३ काेटी रुपयांची कामे सुरू असल्याचे सांगितले. ६७ काेटींच्या कामांच्या निविदा मंजूर अाहेत, तर ११४ काेटी रुपयांची कामे प्रशासकीय मान्यतेच्या प्रतीक्षेत अाहेत. निविदा काढणे, उघडणे वा अन्य मंजुरीच्या प्रतीक्षेत कामे असल्याचेही स्पष्ट केले.

अायुक्त गेले बॅकफूटवर
एरवी अाक्रमक हाेणारे महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम बॅकफूटवर गेले. प्रश्न समजून घेत प्रत्येकाला समजावण्याचा प्रयत्न केला. शासननिर्णयाची माहिती देत नगरसेवक निधीनामक तरतूदच नसल्याचे सांगून ५० लाख वा एक काेटी रुपये अंदाजपत्रकातून मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवू पाठपुरावा करू, असे सांगत अाश्वस्त केले. चालू वर्षी मुकणे धरणासाठी महापालिकेने राखीव ठेवलेला निधी लागणार नसल्यामुळे त्यातून पाण्याच्या टाकीसाठी निधी उपलब्ध हाेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना भाजपचे नगरसेवक आक्रमक
अार्थिक वर्ष संपण्याची वेळ अाली, तरी महासभेने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकाचा ठराव नसल्यामुळे शिवसेना भाजपचे नगरसेवक अाक्रमक झाले. खुद्द अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी महासभेचे अंदाजपत्रक मंजूर झाले की काेठून पैसे उपलब्ध करायचे याचे नियाेजन करू, असे सांगितले. त्यानंतर महापाैर अशाेक मुर्तडक यांनी तूर्तास स्थायी समितीने मंजूर केलेल्या ३० लाख रुपये नगरसेवक निधीप्रमाणे कामे करण्याची सूचना केल्यावर अायुक्तांनी त्यास संमती दर्शवली.
विकासकामांसाठी अावश्यक निधी काेणत्याही मार्गाने मिळत नसल्याने अाक्रमक झालेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी वेलमध्ये उतरत महापालिका प्रशासनाला धारेवर धरले.