आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Member Election On Tree Authority Committee At Nashik

वृक्षप्राधिकरण समितीवर सदस्य नियुक्ती लांबली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वृक्षप्राधिकरण समितीवर सदस्य नियुक्तीवरून समितीतील नगरसेवकांनी मनसेच्या सदस्यांचा प्रस्ताव नाकारल्याने या नियुक्तीला आता राजकीय वळण लागले आहे. यासंदर्भात समितीचे अध्यक्ष तथा आयुक्तांनीदेखील कोणताच निर्णय न दिल्याने सदस्यांची नियुक्ती आणखी लांबली आहे. गेल्या वर्षभरापासून महासभेने याविषयी ठराव करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

वर्षभरापूर्वी महापौर अँड. यतिन वाघ यांनी महासभेत वृक्षप्राधिकरण समितीसाठी नेमणूक करावयाच्या पाच सदस्यांची नावे जाहीर करून ठराव करत तो समितीकडे सादर केला होता. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप भंवर, मनोज घोडके, शिवाजी पालकर तसेच शिवसेना आणि कॉँग्रेसकडून प्रत्येकी एक अशा पाच सदस्यांच्या नावांचा समावेश होता. तथापि, वृक्षप्राधिकरण समिती स्थापन करायलाच एक वर्षाचा कालावधी आयुक्तांनी घेतला यामुळे समितीच्या सदस्यांनादेखील समिती स्थापण्याची प्रतीक्षा लागून राहिली होती. समितीवर आयुक्त संजय खंदारे यांनी नगरसेवक संजय चव्हाण, कुणाल वाघ, अरविंद शेळके, संजय साबळे आणि आकाश छाजेड यांची नियुक्ती झाली होती. तथापि, बाहेरील पाच सदस्यांची नियुक्ती मात्र बाकी होती. याबाबत त्यावेळी कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

सदस्य पात्रतेसाठी लागणारी कागदपत्रे सादर केलेली नसल्याचे कारण त्यावेळी आयुक्तांकडून देण्यात आले होते. यासंदर्भात इच्छुक सदस्य भंवर, घोडके आणि पालकर यांनी ही बाब त्यावेळीदेखील महापौरांच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, त्यावेळी याबाबत सर्वांनीच मौन राखले. आता शनिवारी वृक्षप्राधिकरण समितीच्या झालेल्या सभेत महापौरांच्या सूचनेनुसार पुन्हा समितीवर जादा विषयांमध्ये सदस्यांच्या नियुक्तीचा विषय सादर करण्यात आला होता. विषय समिती पुढे येताच नगरसेवक संजय चव्हाण यांच्यासह काही समिती सदस्य तथा नगरसेवकांनी त्यास विरोध करत संबंधित बाहेरील पाचही सदस्य हे पात्रता पूर्ण करत नसल्याने त्यांची नियुक्ती करणे योग्य ठरणार नसल्याचे कारण देत हा विषय फेटाळून लावला. याबाबत आयुक्तांनी ही बाब पुन्हा पडताळून पाहण्याबरोबरच कागदपत्रांची माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल, असे उत्तर देत विषयावर अधिक बोलणे टाळले.

वृक्ष तोडणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
उद्यान व वृक्षप्राधिकरण समितीची परवानगी न घेताच वृक्षतोड करणार्‍या तीन नागरिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय समितीने घेतला. यासंदर्भात महापौर निवासस्थानाजवळील भूखंडावरील वृक्षतोड, भाभानगर तसेच कॅनडा कॉर्नर येथील घटनेबाबत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. समितीकडे वृक्षतोडीकरिता परवानगी मागणी करणार्‍या प्रस्तावांची पाहणी करून अहवाल सादर करण्याची सूचनाही या वेळी करण्यात आली.

पात्रता पूर्ण केलेली नाही
एकाही सदस्याने सामाजिक वनीकरण विभागाकडे किमान दहा वर्षांपासून नोंदणी असल्याबाबतची अट पूर्ण केलेली नाही. पात्रताच पूर्ण केलेली नसल्याने नियुक्ती कशाच्या आधारे करायची? -संजय चव्हाण, नगरसेवक, शहर विकास आघाडी

अटी पूर्ण तरीही दुर्लक्ष
समितीचे अध्यक्ष तथा आयुक्तांनी सांगितल्यानुसार सर्व अटींची पूर्तता केली आहेत. सामाजिक वनीकरण विभागाच्या उपसंचालकांनी दिलेले पत्रही दिले आहे. यानंतरही वेगवेगळ्या त्रुटी काढून टाळले जात आहे. संदीप भवर, इच्छुक सदस्य, मनसे

जाब विचारू
सदस्यांची नियुक्ती का थांबविण्यात आली, याविषयी अद्याप माहिती घेतली नाही. मात्र, जादा विषयांमध्ये विषय सादर करण्यात आला होता. सदस्यांनीदेखील तशी तक्रार केली आहे. त्याबाबत माहिती घेतल्यानंतर प्रशासनाला जाब विचारला जाईल. अँड. यतिन वाघ, महापौर