आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमजीरोड वाहनतळ ठरले निष्फळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महात्मा गांधीरोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमजवळ सुरू केलेल्या वाहनतळाकडे वाहनचालकांनी पाठ फिरवली आहे. दिवसाकाठी जेमतेम 15 ते 20 वाहने येत असल्यामुळे महिन्याला सुमारे 20 हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याची कैफियत मांडत ठेकेदाराने रस्त्यावरील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी वाहतूक पोलिसांकडे केली आहे.
महात्मा गांधीरोडवरील वाहतुकीची समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून 7 डिसेंबर 2010 रोजी स्टेडियमवर चारचाकी व दुचाकींसाठी वाहनतळ उभारण्याचा निर्णय झाला. वाहतूक शाखेच्या परवानगीने वाहनतळ सुरूही झाले. ठेकेदाराने महिन्याकाठी 33 हजार रुपये वाहतूक शाखेला देण्याचे ठरले. चारचाकीसाठी चार तासांकरिता दहा, तर दुचाकीकरिता पाच रुपये आकारणीचे दरही ठरले. मात्र, या वाहनतळात दुचाकी व चारचाकी वाहने लावण्याबाबत वाहनचालकच उदासीन असल्यामुळे ठेकेदार त्रस्त झाला आहे. दिवसाकाठी जेमतेम 15 ते 20 चारचाकी वाहने येत असल्यामुळे वाहनतळाच्या ठेकेदाराने उत्पन्न तर सोडा, उलटा तोटाच होत असल्याचे गा-हाणे वाहतूक पोलिसांकडे मांडले आहे.
यशवंत व्यायामशाळा, सार्वजनिक वाचनालय, अशोकस्तंभ परिसरातील मोकळ्या जागेत दुचाकी व चारचाकी वाहने सर्रास लावली जात आहेत. येथील काही व्यावसायिक स्वत:ची वाहनेही रस्त्यातच उभी करीत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. परिणामी, वाहतूक कोंडीची समस्या पुन्हा एकदा जटिल झाली आहे. खासकरून सकाळी 10 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत असल्यामुळे रस्त्यात उभ्या केलेल्या वाहनांचा अडसर होत आहे.
रक्कम देणेही अवघड
वाहनतळात चारचाकी व दुचाकी येण्याचे प्रमाण कमी आहे. रस्त्यावरच वाहने लावली जात असल्यामुळे व त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे वाहनतळात कोणी येत नाही. परिणामी वाहनतळ चालवणे व कराराप्रमाणे वाहतूक पोलिसांना ठरलेली रक्कम देणेही अवघड जात आहे. त्यामुळे महात्मा गांधीरोडवरील बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न कायम आहे.
सय्यद मुझफ्फर ईस्माईल, ठेकेदार