आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हाडाची भविष्यातील सर्व घरे होणार ‘प्री-फॅब’ तंत्रज्ञानाने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ( म्हाडा ) घरे आणि गाळे बांधकामांना लागणारा विलंब आणि त्यात काही ठेकेदार काम सोडून निघून जाण्याच्या घटनांमुळे कामे प्रलंबित राहण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने म्हाडाने त्यांची भविष्यातील सर्व बांधकामे प्री - फॅब पद्धतीने करण्याचे निश्चित केले आहे. या पद्धतीमुळे प्रत्येक प्रकल्प निर्धारित वेळेत आणि निर्धारित रकमेत पूर्ण करणे शक्य होणार आहे.
म्हाडाच्या वतीने अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटांसाठी गृहप्रकल्प, दुकाने यासाठीचे प्रकल्प राबविले जातात. प्रत्येक गटासाठी घरांचे साधारण चटईक्षेत्र आणि त्या घरांची सर्वसाधारण किंमत ही निर्धारीत असते. त्यानुसारच ती घरे नागरिकांना देणे म्हाडाला बंधनकारक असते. मात्र, बर्‍याचदा प्रकल्पांसाठीची कार्यालयीन प्रक्रिया लांबल्याने आणि दरम्यानच्या काळात संबंधित कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने हे प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे काही वेळा तर कंत्राटदारदेखील कामातून अंग काढून घेण्याचे प्रकार घडतात. या बाबी घडू नये, यासाठी म्हाडाने या प्री-फॅब तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे धोरण ठरविले असून, राज्यस्तरावर सर्वत्र याच पध्दतीने घरे, दुकाने बांधली जाणार आहेत.
शिर्के समूहामार्फत होणार काम - भारतात सर्वप्रथम प्री - फॅब आणि प्री - कास्ट तंत्रज्ञान आणण्याचे काम हे बी. जी. शिर्के समूहाने केले. या तंत्रज्ञानामुळे कोणतेही बांधकाम हे अत्यंत वेगाने करणे शक्य होते. नाशिकमधील पुढील नऊ प्रकल्पांचे कंत्राट शिर्के समूहालाच प्राप्त झाले आहे.
दोन महिन्यांत वर्कऑर्डर - किमती आवाक्यात राहण्यासाठी या तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होणार आहे. वर्कऑर्डर दोन महिन्यांत निघणार असून सहा महिन्यांत सॅम्पल फ्लॅट तयार झाल्यावर जाहिरात काढून नागरिकांकडून प्रस्ताव मागवले जातील. काम सुरू झाल्यापासून दोन वर्षांत घरे ताब्यात मिळतील. नयना गुंडे, मुख्य अधिकारी, म्हाडा
अत्यंत चांगले तंत्रज्ञान - प्री -फॅब तंत्रज्ञान हे अत्यंत मजबूत स्वरूपाचे असून, प्रकल्प पटापट पूर्ण करणे त्यामुळे शक्य होते. एल अँड टीने गुजरातमध्ये अशा 125 शाळा तर मुंबईतही मोठे गृहनिर्माण प्रकल्प राबवण्यास प्रारंभ केला आहे. साच्यातून तयार होणारी घरे निर्धारित जागेवर असेंबल केली जात असल्याने मोठय़ा प्रमाणात एकसारखी घरे बांधण्यासाठी हे तंत्रज्ञान प्रभावी आहे. जयंत भातांबरेकर, बांधकाम व्यावसायिक