आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘म्हाडा’कडून विलंबाची परंपरा कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दोन वर्षांपासून रखडलेल्या ‘म्हाडा’च्या गृह प्रकल्पांपैकी काही प्रकल्पांचे ‘सॅम्पल फ्लॅट’ सप्टेंबर 2013 पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन हवेतच विरले आहे. आता ‘म्हाडा’तर्फे ‘सॅम्पल फ्लॅट’साठी जुलै 2014 चे आश्वासन देण्यात आले असून, प्रकल्पपूर्तीसाठी मार्च 2015 ची मुदत निश्चित करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये सध्या ‘म्हाडा’चे सात प्रकल्प साकारत असून, त्याअंतर्गत एक हजार 17 घरे पूर्ण होणार आहेत. यात आर्थिक दुर्बल, अल्प उत्पन्न, मध्यम उत्पन्न व उच्च उत्पन्न अशा चार गटांसाठी स्वतंत्र सदनिका उभारण्यात येत आहेत. सर्व इमारती सात ते नऊ मजली असून, त्यांची सोडत जून-जुलै 2014 मध्येच काढण्याची शक्यता असल्याचे ‘म्हाडा’च्या मुख्याधिकारी सरिता नरके यांनी सांगितले.

शहरात पाथर्डी गाव येथे मध्यम 208 सदनिका, त्याजवळच 36 सदनिका, म्हसरूळ येथे 56 सदनिका, हिरावाडी येथे 49 सदनिका, मखमलाबाद येथे 112 सदनिका, पंचक येथे 140 सदनिका, आडगाव येथे आर्थिक दुर्बल गटासाठी 192 सदनिका, तर अल्प उत्पन्न गटासाठी 112 व मध्यम उत्पन्न गटासाठीही 112 सदनिका अशा पद्धतीने प्रकल्पाचे काम सुरू आहे.

उत्पन्न व सदनिका
आर्थिक दुर्बल : 16 हजारांपेक्षा कमी मासिक उत्पन्न असणार्‍या गटांना वन रूम किचनच्या सदनिका मिळतील.
अल्प उत्पन्न : 16 ते 40 हजार- एक बेडरूम, किचन व वर्‍हांडा असलेल्या सदनिका.
मध्यम उत्पन्न : 40 ते 70 हजार- वन व टू बीएचकेच्या सदनिका.
उच्च् उत्पन्न : 70 हजारांच्या वर उत्पन्न असणार्‍यांना टू व थ्री बीएचकेच्या सदनिका मिळतील.

फेरबदल केल्याने विलंब
पाथर्डीतील प्रकल्पाचा ‘सॅम्पल फ्लॅट’ तयार झाला असून, तो या महिन्यातच उपलब्ध होणार आहे. मात्र, अन्य प्रकल्पांच्या ‘सॅम्पल फ्लॅट’मध्ये फेरबदल केल्याने विलंब होत असला, तरी फ्लॅटचा दर्जा उत्तम असेल. नरेंद्र दराडे, अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र विभाग, ‘म्हाडा’

मार्च 2015 पर्यंत पूर्णत्वास
लवकरात लवकर हे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मार्च 2015 मध्ये हे प्रकल्प मार्गी लावल्यानंतर नवीन प्रकल्पांनादेखील सुरुवात करण्यात येणार आहे. सरिता नरके, मुख्याधिकारी, ‘म्हाडा’