नाशिक - अंबड एमआयडीसीत उभारणार असलेल्या गाळेप्रकल्पासाठी लघुउद्योजकांची नोंदणी एका बाजूला सुरू असताना, दुसरीकडे या प्रकल्पाला स्थगितीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. थेट मुख्यमंत्र्यांकडे आता याबाबत तक्रार केली असून, खासगी विकासकापेक्षाही एमआयडीसीचे गाळे महागडे असल्याचे लघुउद्योजकांचे म्हणणे आहे. लघुउद्योजकांनी स्वत: या प्रकल्पाचे बांधकाम केले तरी त्याची किंमत निम्म्यावर येणार असून, बांधकामाची किंमत फुगवण्यात आल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.
लघुउद्योजकांना हक्काच्या गाळ्यासाठी अंबड औद्योगिक वसाहतीत उभारल्या जाणार्या या प्रकल्पात बांधकाम मूल्याचे प्रचलित नियम धाब्यावर बसवले असून, पहिल्यापासून तिसर्या मजल्यापर्यंत प्रत्येक चौरस फुटाची किंमत सारखीच आकारली आहे. विशेष म्हणजे, उद्योजकांनी एका खासगी विकासकाचा खरेदी करारच ‘दिव्य मराठी’कडे सादर केले असून, एमआयडीसी आकारत असलेल्या दरांपेक्षा जवळपास निम्म्या दराने गाळे उपलब्ध आहेत. वास्तव दर आकारल्याने १० लाखांचा गाळा ३०-३२ लाखांत खरेदी करावा लागणार आहे.
गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न
औद्योगिक वसाहतीत जागा मिळवण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून लघुउद्योजकांकडून विविध स्तरांवर पाठपुरावा केला जात आहेत. त्यानंतर गाळ्यांच्या माफक दराऐवजी महागडे गाळे मिळत असल्याने वाढता असंतोष आहे. उद्योजकांचे हित यात पाहिलेले नाही. उद्योजक संघटनांना हा प्रकल्प विकसित करण्यास द्यावा, असे मत अनेक लघुउद्योजकांनी मांडले.
गुंतवणूकदारांसाठी प्रकल्पाचा फायदा
हाप्रकल्प लघुउद्योजकांसाठी असला तरी, यातील महागडे दर त्यांच्यासाठी परवडणारे नाहीत. याचा फायदा मात्र गुंतवणूकदारांनाच होणार असून, त्यामागील असलेला मूळ उद्देश सफल होण्याची चिन्हे कमी आहेत. यामुळेच आता प्रकल्पाची सर्वंकष चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आल्याचे भाजप उद्योग आघाडीच्या वतीने सांगतण्यात आले आहे.