आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुयारी गटारींवरून टोलवाटोलवी, राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रातील अभ्यासाचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- औद्योगिकवसाहतीतील सांडपाणी व्यवस्थापनासंदर्भात महापालिका उद्योग विभागात रस्त्यांची मालकी गटार योजनेच्या जबाबदारीवरून सुरू असलेली टोलवाटोलवी बघून उद्योजक संतप्त झाले. घरपट्टी मलनिस्सारण कर महापालिकेला देत असल्यामुळे त्यांनीच ही जबाबदारी घेण्याची मागणीही उद्योजकांनी केली. अन्य महापालिका क्षेत्रातील एमआयडीसीत सांडपाणी व्यवस्थापन भुयारी गटार योजनेचे काम कोणी केले, याचा अभ्यास करून निर्णय घेण्याचे आश्वासन महापौर यतिन वाघ यांनी दिले.
महापौर दालनात झालेल्या बैठकीत भुयारी गटार योजनेची जबाबदारी उद्योगांना पाणी पुरवणा-या यंत्रणेने घ्यावी, अशी भूमिका महापालिकेचे अभियंता यू. बी. पवार यांनी घेतली. धनंजय बेळे अन्य उद्योजकांनी त्यास हरकत घेत, महापालिका कर घेणारी संस्था असल्यामुळे त्यांनीच भुयारी गटार योजना राबवण्याची मागणी केली.
महापौर वाघ यांनी विकसनाचा निधी उद्योग विभागाकडे जात असल्यामुळे त्यांनी काम करावे, अशी सूचना केली. प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर यांनी दिलेल्या पत्राचा संदर्भ देत, कर घेणारी संस्था महापालिका असल्यामुळे त्यांनीच हे काम करावे, असे उद्योजकांनी स्पष्ट केले. पालिकेला ७० ते ८० टक्के कर उद्योगांकडून मिळत असल्यामुळे टोलवाटोलवी थांबवून तोडगा काढण्याची मागणी त्यांनी या वेळी केली.
अधीक्षक अभियंता पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचा पॅटर्न विचारात घेण्याची मागणी केली. मात्र, कामासाठी लागणाऱ्या निधी हिश्श्यावरून मतभेद सुरू झाले. शेवटी महापौरांनी इतर महापालिका क्षेत्रातील स्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्याचे आदेश दिले. जवाहरलाल नागरी नेहरू पुनरुत्थान अभियानातून विशेष बाब म्हणून निधी मिळवण्यासाठी प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.