आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांनी सकारात्मक प्रतिसाद: मंदिरात वाहून वाया जाणारे दूध लागणार सत्कारणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- श्रावणात महादेवाच्या पिंडीवर केल्या जाणा-या अभिषेकाचे हजारो लिटर दूध वाहून नदी-नाल्यात जाण्यासह मंदिरांत भाविकांच्या पायदळीही येत असल्याने ते गरजू, अनाथ मुलांपर्यंत पोहोचवण्याच्या ‘दिव्य मराठी’च्या विचारास श्री कपालेश्वर मंदिराचे विश्वस्त मंडळ, पोलिस व भाविकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हे दूध गोळा करून योग्य त्या गरजू व्यक्ती व आधाराश्रमाला वितरित करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. दैनिक भास्करने देशभरातील ज्योतिर्लिंग, मोठमोठ्या मंदिरांत हा सामाजिक बांधीलकी जोपासणारा, प्रेरणादायी उपक्रम हाती घेण्यासाठी आवाहन केले आहे. ‘दैनिक दिव्य मराठी’च्या माध्यमातूनही नाशिक शहर व जिल्ह्यातील भाविकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘नंदी नसलेले देशातील एकमेव शिवमंदिर’ असा लौकिक असलेल्या कपालेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी त्यास प्रारंभीच प्रतिसाद दिला आहे. कपालेश्वर मंदिरात दररोज पहाटे 5 वाजेपासून ते 11 पर्यंत हजारोे भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराच्या आवारातील पिंडीवर दुधाचा अभिषेक केला जातो. श्रावणातल्या सोमवारी एक हजाराच्या आसपास तर अन्य दिवशी 500 लिटरपर्यंत दूध वाहत बाहेर पडते. ठिकठिकाणी पाईपलाईन टाकून हे दूध नदीत सोडतात तरी बरेच दूध तेथे साचून दुर्गंधी पसरते. हे दूध वाया न घालवता मंदिर आवारात बसणा-या गरिबांसह आधाराश्रमातील मुलांना द्यावे किंवा त्याची विल्हेवाट लावावी, अशा ‘दिव्य मराठी’च्या आवाहनाला विश्वस्त मंडळाचा प्रतिसाद मिळाला.
कळवा तुमचेही मत
‘दिव्य मराठी’ने सुचविलेल्या उपक्रमाबाबत नागरिकांना काही सूचना, मते मांडायची असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात दिव्य मराठी कार्यालय, प्लॉट नं. 1, शीतल अव्हेन्यू, चांडक सर्कल या पत्त्यावर पाठवाव्यात.
...तर दुग्धाभिषेक सार्थ ठरेल
कपालेश्वर मंदिरात भाविकांनी प्रतिकात्मक दूध पिंडीवर शिंपडून उर्वरित दूध तेथील पुजा-यांकडे द्यावे किंवा मंदिरात दान करावे. जेणेकरून, ते योग्य पद्धतीने साठवून गरजूंपर्यंत पोहचविता येईल. ‘दिव्य मराठी’ने सुचविलेला उपक्रम स्तुत्य असून, दुग्धाभिषेक ख-या अर्थाने सार्थ ठरेल. यास भाविक, पुजारी सर्वांनीच योग्य प्रतिसाद द्यावा. गणेश राठोड, तहसीलदार तथा अध्यक्ष, कपालेश्वर संस्थान

दूध दान करणेच ठरेल योग्य
दूध पिंडीवर वाहण्यापेक्षा त्याचे दान केल्यास उपयोगात येऊ शकते. पिंडीवर थोडेच दूध टाकून मंदिराकडे दान केल्यास त्याचा विनियोग करता येऊ शकतो. त्यामुळे मंदिराची स्वच्छता आणि पावित्र्य अबाधित ठेवण्यास मदत होईल. मंडलेश्वर काळे, विश्वस्त
आदर्शवत उपक्रम ठरेल
दान हे सत्पात्री असावे आणि ते उपयोगात यावे, असा शास्त्राचा संकेत आहे. पिंडीवर वाहण्यात येणा-या दुधाचा समाजातील भुकेल्यांना फायदा होणार असेल तर यासारखी श्रेष्ठ भक्ती कोणतीच नाही. दिव्य मराठीने सुचविलेल्या उपक्रमाचे मनापासून स्वागत असून भाविकांनी सहकार्य केल्यास सर्वत्र हा उपक्रम आदर्शवत ठरेल. अ‍ॅड. भाऊसाहेब गंभीरे, प्रमोद देसाई, विश्वस्त