आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध घेतायेत की ऑक्सिटोसीन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक जिल्ह्यासह राज्यात जनावरांचे दूध काढण्यासाठी ऑक्सिटोसीन या हार्मोनचा सर्रास वापर होत असल्याचे आढळले आहे. नैसर्गिकरीत्या सस्तन प्राण्यांमध्ये मिळणारे हे हार्मोन कृत्रिमरीत्या बनवले जात आहेत. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम जनावरांबरोबर मानवालाही भोगावे लागत आहेत. म्हणूनच केंद्र सरकाराने याच्या वापरावर निर्बंध घातले आहेत.
राज्यात गायी व म्हशी पान्हवण्यासाठी ऑक्सिटोसीनची विक्री व वापर चोरट्या मार्गाने होत आहे. अन्न व औषध प्रशासनही अवैध वापर व विक्री करणा-यांच्या मागावर आहे. परंतु, तेही हतबल झाले आहेत. आंध्रप्रदेश आणि मध्य प्रदेशातून लपूनछपून आणलेल्या ऑक्सिटोसीनच्या बाटल्या गोठेवाल्यांना दिल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारीसुद्धा हे कबूल करीत आहेत. परंतु, तपासणीत आतापर्यंत हाती काही पुरावा लागलेला नसल्याने कारवाई करता येत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. ऑक्सिटोसीन शेजारच्या राज्यातून येत असल्याची माहिती असूनही कारवाई होत नसल्याने एकूण यंत्रणेकडेही संशयाची सुई आहे. नाशिक शहरात खाजगी जकात असून, एकही वस्तू विनाजकातीची सुटू शकत नाही. परंतु ऑक्सिटोसीन कोणत्या मार्गाने शहरात येते हे समजत नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी सांगितले.
गोठेवालेही देत नाही माहिती - गोठ्यावाल्यांना आणि औषध दुकानदार ऑक्सिटोसीनबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगतात. हाडाचे आजार व मुली वेळेच्या आधीच वयात येण्याचे जे प्रमाण सध्या वाढत आहे,यावरून दूधात काही प्रमाणात तरी ऑक्सिटोसीन असावे असे जाणकाराचे मत आहे.
दुचाकीवरून येतात खाकी खोके - शहरातील काही गोठेधारकांकडे एक व्यक्ती दुचाकीवरून खाकी खोक्यातून ऑक्सिटोसीनच्या बाटल्यांचा पुरवठा करतो, त्याच्या येण्याच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने प्रशासनाच्या हातावर तुरी देण्यात ती व्यक्ती नेहमी यशस्वी होत असल्याचे एका माहितगाराने सांगितले.
हार्मोन्स बॅलन्स बिघडतो - ऑक्सिटोसीनचा वापर हा महिला गर्भवती असतील तेव्हा तसेच प्रसूती व प्रसूतीनंतर रक्तस्त्राव जास्त होत असेल तेव्हा केला जातो.परंतु जेव्हा ऑक्सिटोसीन दिले असेल, तेव्हा डॉक्टरांना काळजी घ्यावी लागते. ऑक्सिटोसीनचा वापर जास्त झाला, तर हार्मोन्सचा समतोल बिघडतो त्यामुळे मुली वेळेच्या आधी वयात येतात. तसेच हाडे ठिसूळ होतात असे साइडइफेक्ट होतात. - डॉ. अनिता घाडगे, स्त्रीरोग तज्ञ
पशुपालन करणा-यांनी वापर करू नये - जनावरांना ऑक्सिटोसीनची सवय लागल्यावर जनावरामध्ये गर्भधारणा होत नाही. तसेच गर्भधारणा झाल्यावर गर्भ राहत नाही. जनावरांच्या प्रसुतीच्या वेळी गर्भपिशवीचे तोंड उघडण्यासाठी मदत होते. जनावरांचा पान्हा सोडण्यासाठी उत्तेजीत करण्यासाठी संप्रेरक म्हणुन वापर केला जातो. पंरतु जनावरे पालन करणा-यांनी त्याचा वापर करु नये. - डॉ. संजय विसावे, जिल्हा पशुसंवर्धन अधिक्षक