आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- रोम ऑलिम्पिकच्या त्या शर्यतीत मीच जिंकणार, अशीच सर्वत्र चर्चा होती. मात्र, अखेरच्या क्षणी मी मागे वळून बघितले आणि पदक हुकले. कारण ‘फोटोफिनिश’ काय असते तेच मला माहिती नव्हते, असे सांगत मिल्खासिंग यांनी त्यांच्या ऑलिम्पिकमधील पराभवाची कारणमीमांसा विशद केली.
‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटात मिल्खासिंग यांच्या ऑलिम्पिक पराभवाचा क्षण दाखवताना सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन दिग्दर्शकाने पाकिस्तानचा संदर्भ घेतला आहे. मिल्खासिंग एक क्षण मागे वळून पाहतात, त्या वेळी त्यांच्या कुटुंबावर पाकिस्तानात झालेल्या अत्याचाराचे क्षण त्यांना आठवतात, असे चित्रीत करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात मागचे खेळाडू किती जवळ आहेत, ते पाहण्यासाठी मागे पाहिले आणि त्याच वेळी इतरांना त्यांच्या माना पुढे करून ‘फोटोफिनीश’मध्ये ती शर्यत जिंकल्याचे मिल्खासिंग यांनी सांगितले. ‘त्या वेळी मला ‘फोटोफिनीश’ काय असते, तेच माहिती नव्हते. तेवढे जरी माहिती असती तरी निकाल वेगळा लागला असता’, अशा शब्दात त्यांनी स्वत:च्या आणि भारताच्या दुर्दैवाचे वास्तव उलगडले.
मुझे एक वोट भी नही मिलेगा...
संघटनांवर राजकारण्यांची प्रचंड पकड असते. भारतात राजकारण्यांना आणि ब्युरोक्रॅटसना संघटनांपासून लांब ठेवणे अवघडच आहे. प्रत्येक कार्यकारिणीवर खरे खेळाडू किती आहेत ? समजा मी स्वत: जरी अॅथलेटिक्स संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उभा राहिलो तर ‘मुझे एक वोट भी नही मिलेगा’ हे वास्तव असल्याचेही मिल्खासिंग यांनी सांगितले. संघटनांमध्ये बहुतांश पदे कुणाला द्यायची, ते आधीच ठरलेले असते, हे वास्तवही त्यांनी विशद केले.
एक ‘जुनून’ असावा लागतो
मी एकदा ध्यानचंदजींना विचारले, तुम्ही जगातील सर्वश्रेष्ठ हॉकीपटू कसे झालात? त्यावर ते म्हणाले होते की, मी सायकलच्या टायरने एक गोल आखून घेतो आणि रोज 500 वेळा वेगवेगळ्या अॅँगलने गोल करण्याचा सराव करतो. तहान - भूक विसरून मेहनत घेतली तर नक्कीच भव्य करता येते. हा निव्वळ वेडेपणाच असतो. मात्र तो ‘जुनून ’ तुमच्या डोक्यात असेल तरच ते शक्य असल्याचेही मिल्खा यांनी सांगितले.
77 विजय पण...
जीवनात मी 80 स्पर्धांत धावलो. 77 जिंकलो. त्यात पाकिस्तानमध्ये आयोजित शर्यतीत भाग घेण्याची इच्छा नसतानाही मी तेथे जाऊन जिंकलेल्या शर्यतीचा समावेश आहे. मात्र, त्या शर्यतीपेक्षाही रोम ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकलो नाही, याची खंत वाटते, असे ते म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.