आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Million Cloth Bags Will Be Distributed To Simhastha

लाख कापडी पिशव्यांचे सिंहस्थासाठी होणार वाटप, पहिल्या पर्वणीत दोन लाख पिशव्या वाटणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थकाळात लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होणार आहेत. या भाविकांनी जर प्लास्टिकच्या पिशव्यांचा मुक्तहस्ते वापर केला तर सिंहस्थानंतर या पिशव्यांची विल्हेवाट लावण्याचे अतिशय अवघड आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे. शिवाय या पिशव्यांमुळे नाशिककरांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होऊ शकतो.

ही बाब हेरून जिल्हा प्रशासन, विविध सरकारी विभाग आणि सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहस्थकाळात तब्बल लाख कापडी पिशव्यांचे वाटप करण्याचे नियाेजन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून, त्यातील दोन लाख पिशव्या पहिल्या पर्वणीला वाटप करण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंचवटीतील स्त्रीशक्ती महिला बचत गटाने विनामूल्य पिशव्या तयार करून देण्याचे काम हाती घेतले आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात प्रदूषण होऊ नये म्हणून हरित कुंभ संकल्पनेनुसार लोकसहभागातून कापडी पिशव्या तयार करण्याचे काम जाेरदारपणे सुरू आहे. यात विविध शाळा, महाविद्यालये, पतसंस्था, औद्योगिक कंपन्या आदी ठिकाणी जाऊन संबंधितांना जुन्या साड्या आणून देण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार संबंधित संस्थांमध्ये साड्यांचा अक्षरश: ओघ सुरू झाला. पंचवटीतील स्त्रीशक्ती महिला बचत गटाने या कामाची जबाबदारी घेतली आहे. जुन्या साड्या आणून दिल्यास त्यापासून पिशव्या तयार करून देण्याचे काम हा बचत गट करीत आहे. या गटामार्फत आजवर १४ हजार पिशव्यांचे वाटप झाले आहे. तर सुमारे २७ हजार पिशव्या आज शिवून तयार करण्यात आल्या आहेत. यासाठी ५० महिला कार्यरत आहेत.

प्रदूषणनियंत्रण महामंडळाच्या ५० हजार पिशव्या प्रदूषणनियंत्रण महामंडळाने स्त्रीशक्ती महिला बचत गटाकडे तब्बल ५० हजार खादीच्या कापडी पिशव्या तयार करण्यास दिल्या आहेत. या पिशव्यांवर एका बाजूने हरित कुंभाचा लोगो आणि पर्यावरणाचा संदेश असणार आहे.
यासरकारी विभागांनी घेतला उपक्रमात सहभाग जिल्हाधिकारीकार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, औद्योगिक विकास महामंडळ.
आतापर्यंत ६० हजार पिशव्यांचे वाटप
पालिका क्षेत्रातील सुमारे १३० शाळांच्या विद्यार्थ्यांना जुन्या साड्या देण्याचे आवाहन केले होते. या साड्यांपासून ६० हजार पिशव्या शिक्षण विभागाने वाटल्या. पहिल्या पर्वणीत वाटण्यासाठी विविध शाळांना साड्या आणून देण्याचे आवाहन केले आहे. नवनाथऔताडे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक
महापालिकेकडूनही होतेय जागृती

कापडी पिशव्यांच्या वापरासाठी काही सामाजिक संस्था आणि बचत गट पुढे आले आहेत. नागरिकांनीही जागृत राहून प्लास्टिकचा वापर टाळावा. महापालिकेच्या वतीनेही पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करण्यात येत आहे. -डाॅ. प्रवीण गेडाम, आयुक्त, महापालिका
भविष्यातील धोका टाळण्यासाठी

भाजीविक्रेता, दुकानदार प्लास्टिकचा वापर करतात. प्लास्टिकच्या पूर्ण विघटनासाठी असंख्य वर्षे लागतात, इतके घातक आहे. कुंभमेळ्यात भाविकांनीही प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्यास भविष्यात मोठा धोका निर्माण होईल. कापडी पिशव्यांचा वापर व्हावा. - दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी

४० टक्के उत्पन्न सामाजिक सेवेला
नाशिककरांनी जुन्या साड्या आणून दिल्यानंतर त्या शिवून देण्याची जबाबदारी बचत गटाने घेतली. आजवर ४० हजारांवर पिशव्या झाल्या. एका पिशवीला साधारण रुपये ७५ पैसे खर्च येतो. तो उत्पन्नातील ४० टक्के भाग बचत गटात जमा करून भरून काढतो. सुदाम निकम, स्त्रीशक्ती बचतगट

जुने कपडे जमा करण्याचे आवाहन
स्त्रीशक्तीबचत गटाकडे आलेल्या जुन्या कपड्यांपैकी मळलेले कपडे प्रथमत: स्वच्छ धुवून घेतले जातात. त्यानंतर त्याच्यापासून पिशव्या केल्या जातात. कपड्यांत साड्या, टी शर्ट, शर्ट, पँट आदींचा समावेश असतो. कोणाला अशा प्रकारचे जुने कपडे दान करावयाचे असल्यास ९८२३१२३५८८ या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या सेक्रेटरी दीपाली कुलथे यांनी केले आहे.
ग्राहकांकडील प्लास्टिकच्या पिशव्यांच्या बदल्यात कापडी पिशव्या देताना.