आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MIM, Shiv Sena Come Together For Power In Malegaon Municipal Corporation

एमआयएम, शिवसेनेची मालेगाव महानगरपालिकेत सत्तेसाठी युती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - राज्यभर विस्तारत असलेल्या हैदराबादस्थित ‘एमआयए’ पक्षाला शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही शिवसेनेच्या नेत्यांनी ‘एमआयएम’च्या नेत्यांवर विखारी टीका केली होती. मात्र, सत्तेसाठी तत्त्व, विचारधारा बाजूला ठेवून काेण कुणाशी हात मिळवणी करील याचा नेम नसतो. मालेगाव महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस- जनता दल आघाडी आणि ‘महाज’ व मित्रपक्षांच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व एमआयएम समर्थक नगरसेवकांनी ‘महाज’च्या उमेदवाराला पाठिंबा दिला असून शिवसेना नगरसेवकही ‘महाज’च्याच पाठीशी आहेत.
म्हणजेच ‘महाज’चा उमेदवार निवडून आणण्यासाठी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेना व एमआयएम नगरसेवकांनीच अप्रत्यक्ष हातमिळवणी केल्याचे अनोखे चित्र दिसून आले आहे. मालेगाव महापौरपदाची बुधवारी निवड होणार आहे. महाज मित्र पक्षांकडून मोहंमद इब्राहिम, तर काँग्रेस- जनता दल आघाडीकडून बुलंद एकबाल हे महापौरपदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पालिकेतील सदस्य संख्या ८० आहे. त्यामुळे बहुमतासाठी ४१ नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. सध्या दोन्ही बाजूंचे संख्याबळ समसमान झाल्याने एका मतासाठी चांगलीच चुरस आहे. त्यातच शगुफ्ता बानो शेख शफिक या काँग्रेसच्या नगरसेविकेला तीन अपत्ये असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय स्थानिक न्यायालयाने दिला आहे. मात्र, संबंधित नगरसेविकेने त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले असले, तरीही याचिका फेटाळण्यात आली आहे. मात्र, याबाबतचा आदेश पालिका प्रशासनाला अद्याप न मिळाल्यामुळे या नगरसेविकेच्या सदस्यत्वाचा निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे या तांत्रिक मुद्द्यावर निवडणुकीत गोंधळ वाढण्याची शक्यता आहे.