नाशिक- केंद्र शासनाच्या मार्ग परिवहन व महामार्ग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेप्रमाणे ह्यद कॅरिज बाय रोड अॅक्ट २००७ आणि २०११ या कायद्यानुसार अवजड, तसेच इतर वाहनांतून मालाची ने-आण व वितरणाचे कामे करणाऱ्या चालक व वाहकांना "कॉमन कॅरियर'ची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणकडून नोंदणीची ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पेठरोड येथील परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून कॉमन कॅरियरची नोंदणीप्रक्रिया सुरू झाली असून, नाशिक, निफाड, चांदवड, सिन्नर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांतील व्यक्ती व संस्थांना नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी विहित अर्ज १ सोबत नोंदणी व १२५० रुपये प्रक्रिया शुल्क व प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांच्या नावाने पाच हजार रुपयाचा डीडी, पोस्टर ऑर्डर जोडावी. संस्थेचा प्रकार, व्यवसाय स्थापनेचे वर्ष, पॅनकार्ड, परिवहन कार्यालयात नोंदणी केली असल्यास पुरावा, दूरध्वनी क्रमांक, ओळखपत्र, वाहनांची नोंदणी प्रमाणपत्र, आयकर विवरणपत्र ही कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहनकडून करण्यात आले आहे.