आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Missing Electricity Issue At Nashik, Divya Marathi

भारनियमन नाही तरी तासन्तास वीज गायब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात लोडशेडिंग नसूनही शहरांतील अनेक भागांत नागरिकांना दहा दिवसांपासून दिवसा आणि रात्रीही विजेच्या खेळखंडोब्याला सामोरे जावे लागत आहे. कर्मचारी नागरिकांना भारनियमन असल्याने सांगून वेळ मारून नेतात, तर अधिकारी मात्र भारनियमन नसल्याचे सांगतात. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

भारनियमनामुळे दिवसा वाढत्या उकाड्याने हैराण, तर रात्री काळोखामुळे झालेली भुरट्या चोर्‍यांमध्ये वाढ यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. इंदिरानगर, राणेनगर, नाशिकरोड, देवळालीगाव, आर्टिलरी रोड येथे रविवारी दुपारीही वीजपुरवठा खंडित झाला होता.

मखमलाबाद, मखमलाबाद नाका, विवेकानंदनगर, इरिगेशन कॉलनी, शांतीनगर, ओमकारनगर, राऊ हॉटेल परिसरात, तसेच सिडको, कॉलेजरोड परिसरातील काही भागात विजेचा लपंडाव होत आहे. अनेक वीजग्राहकांनी महावितरण कार्यालयात चौकशी केल्यावर लोडशेडिंग असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे.
शहरात कोणत्याही ठिकाणी सध्या लोडशेडिंग नसल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांनी सांगितले, तरी तास ते दोन तास वीजपुरवठा खंडित का केला जात आहे, असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.

बिल भरून त्रास
वीजबिल भरूनही वीजग्राहकांना त्रास होत आहे. संबंधित अधिकार्‍यांना विचारणा केली असता समाधानकारक उत्तर तर नाहीच, उलट उद्धट उत्तरे दिली जातात. निखिल कुलकर्णी, शहरी वीजग्राहक

चोरट्यांचे फावते
वीजचोरी करणार्‍यांवर कारवाई करण्याचे सोडून ‘महावितरण’ सर्वांनाच त्रास देत आहे. एस. के. गायकवाड, ग्रामीण वीजग्राहक

कामांमुळे भारनियमन
शहरात भारनियमन नसून, राज्यस्तरावरील तांत्रिक अडचणीमुळे काही काळ वीजपुरवठा खंडित होत आहे. सध्या दर शनिवारी पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू आहेत. सी आणि डी वर्गाचे भारनियमन अल्प प्रमाणात सुरू असून, ए आणि बी वर्गाचे भारनियमन नाही. वैदेही मोरे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण
कर्मचारी म्हणतात भारनियमन; अधिकार्‍यांचा नकार