आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Missing Girl Reached Safe For Whats App Issue At Nashik, Divya Marathi

बेपत्ता मुलगी व्हॉट्स अँपमुळे पोहोचली सुखरुप घरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - व्हॉट्स अँपवर अनेक आक्षेप घेतले जातात. चांगल्या कामांसाठी कमी आणि नको त्या कामांसाठीच अधिक असा त्याचा उल्लेखही होतो. पण, हेच व्हॉट्स अँप एखाद्या हरविलेल्या मुलीच्या मदतीला धावून आले तर! आश्चर्य वाटते ना.. पण अशीच शहरातील एक मुलगी हरवली असताना ती व्हॉट्स अँपमुळे पालकांना सुखरूप सापडली.

पंचवटी परिसरातील एका उच्चभ्रू कुटुंबातील सतरा वर्षीय मुलगी सकाळपासून बेपत्ता होती. पालकांना कळताच त्यांनी सर्वत्र शोध घेऊनदेखील ती मिळून आली नाही. दुपारी 12 वाजेच्या दरम्यान पंचवटी पोलिस ठाण्याच ती मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रारही करण्यात आली. पोलिसांकडून सर्व माहिती गोळा करण्याचे काम सुरू असताना रात्री अकरा वाजेच्या दरम्यान राष्ट्रवादीचे पंचवटी विभागाचे अध्यक्ष देवांग जानी यांना बांद्रा, मुंबई येथील त्यांचे मित्र दीपक ठक्कर यांनी फोनवरून मुलीची माहिती दिली. जानी यांनी ती माहिती व तिचा फोटो व्हॉट्स अँपवर मागितला. तो मिळताच जानी यांनी रात्री 11.30 वाजेच्या दरम्यान पंचवटी पोलिस ठाणे गाठत वरिष्ठ निरीक्षक शांताराम अवसरेंना मुलीबद्दलची माहिती दिली. ही मुलगी दुपारी बेपत्ता असल्याची नोंद पोलिस ठाण्यात होतीच. अवसरे यांनी ठक्कर यांना फोनवरून मुलीसह बांद्रा पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याची सूचना केली. ठक्कर यांनी आपल्या दोन मित्रांसह मुलीची आपुलकीने चौकशी करीत तिला बांद्रा पोलिस ठाण्यात सोडले. तोपर्यंत अवसरे यांनी रात्रीच दोन पोलिस कर्मचार्‍यांना मुलीच्या पालकांसमवेत बांद्रा येथे जाण्याचे आदेश दिले. पोलिस ठाण्यात मुलीने आई-वडिलांना पाहताच अर्शूंना वाट मोकळी करून दिली. पालकांनी ठक्कर आणि त्यांच्या दोन मित्रांचे आभार मानले.

कर्तव्यदक्षतेमुळे शक्य झाले
मोबाइलवर मुलीचा फोटो पाठवून नागरिकांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले. बेपत्ता मुलीची नोंद आणि पाठवलेल्या माहितीत साधम्र्य आढळून आले. रात्रीच कर्मचार्‍यांना रवाना करून मुलीस ताब्यात घेत आई-वडिलांच्या ताब्यात दिले. नागरिकांनी दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेमुळे हे शक्य झाले. शांताराम अवसरे, वरिष्ठ निरीक्षक, पंचवटी पोलिस ठाणे

कर्तव्य पार पाडल्याचा आनंद
मित्राने फोनवरून मुलीची माहिती दिली. थोड्या माहितीच्या आधारे तिचा पत्ता शोधणे अवघड होते. तत्काळ अवसरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आणि मित्रांनी दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेमुळे मुलगी सुखरूप मिळाली, याचा आनंद जास्त आहे. देवांग जानी, अध्यक्ष, पंचवटी विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस