आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुख‌द सोमवार : कुंभमेळ्यामध्ये हरवलेल्यांची शंभर टक्के झाली घरवापसी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दोन भावंडं लहानपणी कुंभमेळ्यात हरवतात आणि वेगवेगळ्या घरांत वाढतात. आपला भाऊ कुंभमेळ्यात हरवल्याची माहिती मिळाल्यानंतर अगदी उतारवयापर्यंत ते एकमेकांना शोधत बसतात, हे अनेक हिंदी चित्रपटांतील ठरलेले कथानक. त्यामुळे कुंभमेळ्यातील प्रचंड गर्दी ही जणू, एकप्रकारे हरवल्यांचे अथवा आप्तांपासून ताटातुटीचे प्रतीकच बनलेली. मात्र, यंदाच्या कुंभमेळ्यात हरवलेल्या प्रत्येकाला त्याच्या आप्तांशी पुनर्भेट करून देण्यात आलेले यश हे कथानकांची ही संकल्पनाच मोडीत काढणारे ठरते. पोलिसांची लोकांची सकारात्मक मानसिकता, सामाजिक संस्थांचे प्रयत्न आणि त्याला मिळालेली आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यामुळे यंदाच्या कुंभमेळ्यात हरविलेल्या तब्बल २११८ जणांपैकी प्रत्येकाचीच आपल्या कुटुंबीयांशी पुनर्भेट होण्याचा चमत्कार घडून आला.
यंदाच्या कुंभमेळ्यात नाशिकच्या तीन आणि त्र्यंबकेश्वरच्या दोन पर्वण्यांत उसळलेल्या लाखोंच्या गर्दीत २११८ जण हरविले होते. परंतु, शहरभर बसविण्यात आलेले ३४८ सीसीटीव्ही आणि नियंत्रणासाठी पोलिस आयुक्तालयातील मुख्य नियंत्रण कक्ष उपयुक्त ठरले. पारंपरिक बिनतारी संदेश यंत्रणेसह भारत-भारतीच्या हेल्पलाइनने वापरलेल्या व्हॉट्स‌अॅपसारखा सोशल मीडियाही उपयुक्त ठरला. नाशिकमध्ये २००३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात रामकुंड पंचवटी परिसरातून ३५० लोक हरवले होते. त्यापैकी १५ लोकांचे नातेवाईक आजपर्यंत मिळालेले नाहीत. मात्र, यंदाच्या कुंभमेळ्यात पोलिसांची संख्या जशी वाढली तसेच तंत्रज्ञानाचीही मोठी मदत मिळाली. पोलिसांनी उभारलेला सुसज्ज सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, तर दुसरीकडे भारत -भारतीसारख्या बहुभाषिक स्वयंसेवी संस्थांकडून हरवलेल्यांच्या उद‌्घोषणेसाठी मिळणारी मदत, प्रभावी संदेश देवाणघेवाण यामुळे हरवलेल्या प्रत्येकाची त्याच्या आप्तेष्टांसमवेत भेट घडवून देणे शक्य झाले.

सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष ठरला प्रभावी
जयंती पाधी ही ओडिशातून आलेली महिला आपल्या ग्रुपपासून हरविली होती. या महिलेला स्वयंसेवकांनी सीसीटीव्ही कंट्रोल रूममध्ये आणल्यानंतर तेथे त्यांना नदीवरील घाट टीव्ही स्क्रीनवर दाखविण्यात आले. त्यात त्या जेथे उतरल्या तो घाटाचा परिसर त्यांनी ओळखला आणि त्यांना तपोवनात उतरलेल्या त्यांच्या ग्रुपसोबत पुन्हा सहभागी होता आले. कुंभमेळ्यात हरवलेल्यांना मिळवून देण्याबाबत अशा अनेक घटना घडल्या. सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आणि थेट फिल्डवर कार्यरत असलेले स्वयंसेवक यांच्यातील उत्तम समन्वयामुळे हे शक्य झाले.
तंत्रज्ञान आणि संस्थांचे सहकार्य उपयुक्त
हरवलेल्या व्यक्तींसाठी स्वतंत्र सेल स्थापन करण्यात आला होता. तंत्रज्ञान आणि वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून हरवलेल्यांचा शोध घेणे शक्य झाले. कुंभमेळ्यात ताटातूट होणाऱ्यांमध्ये वृद्धांची संख्या सर्वाधिक होती. अशा भाविकांची भेट घडवून आणण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञानाचा फायदा झाला. सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले.
एस. जगन्नाथन, पोलिस आयुक्त, नाशिक
ध्वनिक्षेपण यंत्रणा ठरली मार्गदूत
त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांच्या गर्दीत हरवलेल्यांचा शोध घेणे शक्य नव्हते. संबंधित व्यक्तीच्या नावाची नियमित उद्घोषणा सुरू ठेवल्यानंतरही अपयश येत होते. अखेर सर्वच बाह्य पार्किंगवर बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे पोलिसांकडून हरवलेल्यांबाबत माहिती देण्यात येत होती. नातेवाईक मिळून आल्यानंतर पोलिस वाहनांतून त्यांना त्या ठिकाणांवर सोडले गेल्याने सर्वच हरवलेल्यांची भेट शक्य झाली.
संजय मोहिते, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
उज्जैनलाही मिळणार सेवा
पुढील वर्षी उज्जैन येथे कुंभमेळा होत असून, भारत-भारतीची हेल्पलाइन तेथेही भाविकांना सेवा देणार आहे. यासाठी नियोजन सुरू असून, नाशिकचा अनुभव पाहता तेथेही हरवलेल्यांची आप्तांशी पुनर्भेट घडवून देण्यासाठी स्वयंसेवक कार्यरत असतील.
प्रदीप पेशकार, समन्वयक, भारत-भारती, नाशिक
आई-वडिलांची लेकीशी पुनर्भेट
त्र्यंबकेश्वरयेथे गजानन महाराज मंदिराजवळच्या पार्किंगमध्ये पंचवीस वर्षीय मुलीला थांबायला सांगून तिचे माता-पिता राहाण्यासाठी जागा मिळेल का, याची माहिती घेण्यासाठी गावात गेले. बराच वेळानंतर ते परतले नाही म्हणून दोन वर्षांच्या बाळासह ती मुलगी पार्किंगची जागा सोडून त्यांना शोधायला गेली. नेमके त्याचवेळी तिचे आई-वडील परतले. परंतु, कुटुंबाची ताटातूट झाली. वडिलांनी तिला शोधण्यास सुरुवात केली शेवटी पोलिस ठाण्यात गेले. तेथे त्यांची भाषा पोलिसांना समजेना. भारत-भारतीची मदत प्रभावी ठरली. या संस्थेच्या स्वयंसेवकांनी ही मुलगी तेलुगू भाषेतील असल्याचे जाणून तिच्या भाषेतून उद्घोषणा केल्या. अवघ्या काही तासांत या कुटुंबाची पुनर्भेट गजानन महाराज मंदिराजवळच्या पार्किंगमध्येच पोलिस स्वयंसेवकांनी घडवून आणली.