आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशपत्र एका विद्यार्थिनीचे, फोटो दुसरीचा अन् सही तिसरीचीच...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - यंदाबारावीची परीक्षा देणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या हॉलतिकिटांमध्ये गंभीर चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही विद्यार्थिनींच्या प्रवेशपत्रावर दुसऱ्या विद्यार्थिनीचा फोटो तिसऱ्याच विद्यार्थिनीची सही असल्याने त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यायचे की, चुकांची दुरुस्ती करण्यात वेळ घालवायचा, असा प्रश्न संतप्त विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
येत्या फेब्रुवारीपासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी)परीक्षेला प्रारंभ होणार आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा होणार असून, त्यानंतर १८ फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा सुरू होईल. परीक्षा तीन-चार दिवसांवर येऊन ठेपली असून, विभागीय शिक्षण मंडळातर्फे विद्यार्थ्यांना स्थानिक महाविद्यालयांत हॉलतिकिटांचे वाटप सुरू झाले असून, ३० जानेवारीनंतर विभागातील कनिष्ठ महाविद्यालयांत हॉलतिकिटांचे वाटप केले जाणार आहे.

अभ्यासावर परिणाम
^परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासासाठी सध्याचा वेळ महत्त्वाचा असताना हॉल तिकिटांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी खूप वेळ लागला. - अमृता बेलगावकर, विद्यार्थिनी

प्राचार्यांकडून दुरुस्ती
^महाविद्यालयांत हॉलतिकिटांचे वाटप करण्यात आले आहे. सदोष हॉलतिकीट प्राचार्यांकडून दुरुस्ती करून घ्यावी. आर. आर. मारवाडी, सचिव,विभागीय शिक्षण मंडळ

विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
^बारावीचे वर्ष करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. हॉल तिकिटातील चुका दुरुस्तीत वेळ लागल्याने नाहक मनस्ताप होत आहे. प्रसाद देशमुख, विद्यार्थीआघाडी, पुरोगामी विचार मंच

एक लाख ५६ हजार विद्यार्थी हाेणार प्रविष्ट
बारावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागात कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखा यांचे एकूण एक लाख ५६ हजार विद्यार्थी प्रविष्ट होतील. ते १६ फेब्रुवारी या कालावधीत प्रात्यक्षिक, तर १८ फेब्रुवारी ते २८ मार्चदरम्यान लेखी परीक्षा होणार आहे.

हॉल तिकिटांमध्ये अक्षम्य चुका
काही विद्यार्थिनींच्या हॉलतिकिटावर दुसऱ्याच विद्यार्थिनीचा फोटो प्रिंट झाला आहे. सही तिसऱ्याच विद्यार्थ्याची आहे. सदोष हॉलतिकिटांची संख्या एकाच महाविद्यालयात १०० हून अधिक असल्याने इतर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांमध्येही चुका असण्याची शक्यता आहे.