सिन्नर- सिन्नर-नाशिकचौपदरीकरणासाठी होणा-या भूसंपादनास काही शेतक-यांनी न्यायालयात हरकत घेतली होती, मात्र ती फेटाळत उच्च न्यायालयाने त्या प्रक्रियेवरील स्थगिती उठविली आहे. 13 नोव्हेंबरनंतर ती प्रक्रिया पुन्हा सुरू होईल. त्यामुळे पळसेपासून सिन्नरपर्यंत सर्व गावांतील शेतक-यांशी सकारात्मक चर्चा करुन रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली.
माळेगावच्या निमा हाऊसमध्ये उद्योजकांच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. रस्त्याच्या या कामास हरकत घेणाऱ्यांमध्ये एक शेतकरी या नात्याने
आपलाही समावेश होता. मात्र, जमिनीचा मोबदला देण्याच्या दरात मोठा फरक असल्यामुळेच शेतकऱ्यांनी या हरकती घेतल्या हाेत्या, अशी माहितीही वाजे यांनी यावेळी दिली. १३ नोव्हेंबरनंतर होणाऱ्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांची बैठक बोलावून त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली जाईल. चौपदरीकरण अाणि बाह्य वळण रस्त्याचा मुद्दा मार्गी लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ट्रक टर्मिनसचे काम लवकर मार्गी लावले जाईल, माळेगावचे मंजूर पोलिस स्टेशन मुसळगावला हलविले जाणार असल्याने माळेगाव येथे पोलिस चौकी उभारण्यासाठी प्रयत्न करू, औद्योगिक भूखंड, ‘डी’ झोनबाबत अभ्यासाअंती चर्चा केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. उद्याेजकांच्या समस्या साेडविण्यासाठी अापण त्यांना सर्व सहकार्य करू, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी उपस्थित उद्याेजक प्रतिनिधींना दिली.
व्यासपीठावर निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष सुधीर बडगुजर, अतिरिक्त उपाध्यक्ष अरुण चव्हाणके, जगदंबा पतसंस्थेचे चेअरमन नामकर्ण आवारे, उपाध्यक्ष किशोर राठी, अतिरिक्त चिटणीस आशिष नहार, उपअभियंता पी. के. पाटील, सरपंच तुकाराम सांगळे उपस्थित होते. कार्यक्रमास उद्योजक कृष्णा नाईकवाडी, बबन वाजे, दत्ताजी ढोबळे, नीलेश काकड, सोमनाथ पावसे, बनुशेठ पगार, किरण वाजे, किरण खाबिया, अरुण चव्हाणके आदींसह उद्योजक उपस्थित होते. मिलिंद रजपूत यांनी सूत्रसंचालन केले. आभार आशिष नहार यांनी अाभार मानले.