आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दीने ‘कमल’ फुलले; चर्चेने ‘वसंत’ खुलले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मनसेचे नाराज आमदार वसंत गिते यांच्या सर्मथनासाठी कार्यकर्त्यांपासून तर पदाधिकार्‍यांपर्यंत सर्वांनीच गर्दी केल्यामुळे त्यांचे ‘कमल’ हे निवासस्थान सोमवारी फुलून गेले होते. याच निवासस्थानी मनसेच्या नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, दीपक पायगुडे या तिन्ही नेत्यांनी गिते यांची नेमकी दुखरी नस कोणती, हे जाणून विचारपूस केल्यानंतर मात्र वसंत खुलले व राज ठाकरे यांच्या भेटीसाठी रवाना झाले.
मनसेतील गेल्या काही दिवसांपासूनच्या घडामोडींमुळे अस्वस्थ असलेल्या गिते यांनी रविवारी राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी दांडी मारली. दुसरीकडे गिते सर्मथकांनी शक्तिप्रदर्शन केले. लागोलागच भाजपात जाण्याबाबतही चर्चा सुरू झाली. यामुळे मनसेतील नाराजी नाट्य रंगात आले असताना, दुसर्‍या अंकात नेमके काय होणार, याची उत्सुकता होती. सकाळपासूनच गिते यांच्या निवासस्थानी पदाधिकार्‍यांची गर्दी होत होती. त्यातून गिते सर्मथक नगरसेवकही फोन करून आपल्या सहकार्‍यांना बोलावत होते. महापौर अँड. यतिन वाघ यांनीही गिते यांची भेट घेऊन विचारपूस केली. नगरसेवकांना विचारल्यानंतर ते सर्मथन वा पाठिंबा वगैरेचा उद्देश नसून, केवळ दुखापतीमुळे भाऊंची भेट घेण्यासाठी आलो, असे स्पष्टीकरण देत होते. अशातच राज यांचा दौरा सुरू झाल्यावर मात्र नगरसेवक त्यात सहभागी झाले. दौरा संपल्यानंतर मात्र पुन्हा काही नगरसेवकांनी गितेंच्या निवासस्थानी धाव घेतली.
असा झाला समेट
गितेंची नाराजी दूर करण्यासाठी सकाळी आमदार नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर व दीपक पायगुडे हे त्रिकूट नाशकात दाखल झाले. त्यांनी गितेंच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन नाराजीचे कारण विचारले. सूत्रांनुसार त्यात गिते यांनी महिनाभरापासून आपल्याविरोधात सुरू असलेल्या कुरापतींची कारणे दिली. पालिकेचा कारभार सांभाळताना गैरप्रकार केल्याची चुकीची माहिती साहेबांपर्यंत पोहोचवली गेली. नगरसेवकांविरोधात असल्याचे वातावरण निर्माण केले गेले. मात्र, त्यात ‘अर्थ’ नसून, जर शहानिशा करायची असेल तर नगरसेवक व मी आमनेसामने बसण्यास कधीही तयार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, अन्य कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. गिते यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तिघांनी नाराजी बाजूला ठेवून राज ठाकरे यांची भेट घेण्याची विनंती केल्यावर ते राजी झाले.