आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसे-भाजप नेत्यांचा शहरात तळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्थायी सभापतिपदाची निवडणूक नाट्यमय वळणावर येऊन ठेपली असून, मनसे व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गुरुवारी शहरात तळ ठोकून जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला.
कराराप्रमाणे यंदा भाजपचा या पदावर दावा असल्याचे उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. मात्र, मनसेने लोकसभा निवडणुकीत भाजपला दिलेला बिनशर्त पाठिंबा लक्षात घेत मनसेने एक वर्षासाठी पुन्हा संधी देण्याची मागणी केली. भाजपचे स्थानिक नेते यास राजी होत नसल्याने मुंबईत हालचाली झाल्या. त्यानंतर आमदार बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई गुरुवारी दुपारी शहरात दाखल झाले. त्यांनी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, सभागृहनेते शशिकांत जाधव व उमेदवार राहुल ढिकले यांच्याशी चर्चा करून राजकीय स्थिती जाणून घेतली. या वेळी संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर उपस्थित होते. दरम्यान, पक्षाध्यक्ष राज ठाकरे व नांदगावकर यांनी तिढा सोडवण्याच्या दृष्टीने भाजप आमदार गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली व महाजनही गुरुवारी सायंकाळी शहरात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसेकडून भाजप नेत्यांची मनधरणी सुरू असून त्यांनी मान्य केल्यानंतर सेनेला राजी करण्याचा प्रश्न मनसेपुढे असेल.

नव्या वादाला तोंड
सभापतिपदावर भाजपचा दावा असल्याचे नांदगावकरांनी पत्रकार परिषदेत मान्य केले. यापूर्वी शिवसेनेचे स्थानिक नेते मनसेसोबत झालेल्या कराराप्रमाणे यंदा सभापतिपदावर आपलाच दावा असल्याचे सांगत होते. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्हे असून, यात सेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

भाजपचे पारडे जड
आमदार गिरीश महाजन यांनी कोणत्याही स्थितीत सभापती भाजपचाच होईल, असा दावा केला. शिवसेना सहयोगी पक्ष असून, त्यांच्याशी चर्चा होईल. मात्र, तूर्तास कराराप्रमाणे सभापतिपद आम्हाला द्यावे लागेल व त्याबाबत राज ठाकरे यांच्याशीही चर्चा झाली असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे तुलनेत भाजपचे पारडे जड असल्याचे चित्र आहे.