आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेतील वाद ‘कॅश’ करण्याचा युतीचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका स्थायी समिती सभापतिपदाची उमेदवारी राहुल ढिकले यांना दिल्यामुळे मनसेतील नाराज असलेल्या एका गटाचा फायदा उचलण्याची खेळी शिवसेना व भाजपने सुरू केली आहे.

या गटाकडून भाजप व शिवसेना या दोघांना सभापतिपद देण्यासाठी आग्रह धरला जात असून, नाराज गटाची मर्जी मिळवण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मनसेतील गटबाजी कमी होण्याऐवजी वाढल्याचे चित्र आहे. ‘नाशिक मॉडेल’करिता संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांच्याकडे सूत्रे दिली, तर दुसरीकडे शहराध्यक्षपदावर राहुल ढिकले यांची नियुक्ती करून आमदार वसंत गिते यांनाही शह देण्याचा प्रयत्न झाल्याचे लपून राहिलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून गिते यांचा सहभाग कमी झाल्याचे दिसत आहे. दुसरी बाब म्हणजे ढिकले यांना शहराध्यक्ष, स्थायी समिती सदस्य व आता सभापती करण्याची खेळीही मनसेच्या नगरसेवकांना उमगलेली नाही. त्यात वजनदार नगरसेवकांनी नाराजीचा सूर आळवला असून, त्यांनीही यंदा भाजप व शिवसेनेचा विचार करून सभापतिपद देण्याबाबत पक्षश्रेष्ठींकडे मागणी केल्याचे समजते. बाळा नांदगावकर यांनी नाशिक दौर्‍यात कराराप्रमाणे सभापतिपद भाजपकडेच देणे अपेक्षित असल्याचे सूचक वक्तव्य केले होते. दुसरीकडे भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनीही सभापतिपदावरील हक्क सोडण्यास नकार दिला होता. स्थानिक पदाधिकारीही सभापतिपद मिळवण्यासाठी आक्रमक असल्यामुळे मनसेची अडचण झाली आहे. शिवसेनेचे सदस्यही सहलीवर गेल्याचे वृत्त आहे. अशा परिस्थितीत मनसेला सभापतिपद मिळवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे.