आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Contest Elections In Kalyan Dombavali Corporation

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेचा ‘नाशिक ढोल’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचे (कडोंमपा) नगारे वाजू लागल्यानंतर मनसेने नाशिकमधील गोदापार्क, बॉटनिकल गार्डनपासून तर सिंहस्थाच्यानिमित्ताने झालेल्या नवनिर्माणाची चित्रफीत करून सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज बुलंद करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्याची खास जबाबदारी मनसेच्या नाशिक विद्यार्थी सेनेवर सोपवण्यात आली असून, नाशिकमधील मनसेचे एकूणच ब्रँडिंग हे तरुण पदाधिकारी ठाण्यातील मनविसे मतदारांपर्यंत पोहोचवणार आहेत. परिणामी, मनसेच्या ‘नाशिक ढोल’चा आवाज आता राज ठाकरे यांच्याडुबत्या नय्येला काठावर आणण्यासाठी कितपत प्रभावी ठरतो, हे बघणे रंजक ठरणार आहे.

ठाकरे यांचे प्रभावक्षेत्र मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये मनसेची पुरती वाताहत झाली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतरच्या काळात पदाधिकाऱ्यांची ओहोटी लागली. त्यामुळे मनसेच्या तंबूत सध्या बोटावर मोजण्याइतकेच पदाधिकारी उरले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत महापालिकेची साथ धरून ठाकरे यांनी नवनवीन प्रोजेक्टसाठी धडपड सुरू केली आहे. बड्या उद्याेजकांच्या सीएसआर अॅक्टिव्हिटीतून होणाऱ्या नवनिर्माणाचा डंका आता ठाण्यात वाजवण्याची तयारी सुरू झाली आहे. सद्यस्थितीत गोदापार्कच्या कामाचा पहिला भाग अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गेल्या निवडणुकीत ठाकरे यांनी ‘तिकडे नाशिकमध्ये जाऊन आमचा गोदापार्क बघा’ असा प्रचार केला होता. मात्र, त्यावेळी गोदापार्कचे काम कागदोपत्रीच होते. अशा परिस्थितीत गोदापार्कची चित्रफीत मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी निर्णायक ठरेल, असे पक्षाला वाटते. त्याबरोबरच पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेले बॉटनिकल गार्डन, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रस्तावित ऐतिहासिक शस्त्रास्त्र संग्रहालय, सिंहस्थात तयार केलेले ४०० कोटी रुपयांचे रस्ते, गोदावरीवरील घाटांचे बांधकाम अशा सर्व महत्त्वाच्या प्रकल्पांचे संकलन करून सोशल मीडियावर त्याचा प्रचार केला जाईल. त्यासाठी मनसेच्या ठाणे विद्यार्थी शहर संघटनेच्या अध्यक्षांनी कंबर कसली असून, त्यांना नाशिकच्या मनविसेकडून आवश्यक रसद पुरवली जात आहे.

शब्द पाळला, हे दाखविण्याचा प्रयत्न
नाशिक शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती, वर्तमानपत्रातून झालेली त्यांची प्रशंसा आदी सर्व माहितीच्या क्लिप्स तसेच बॅनर सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाणेकरांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. राज ठाकरे यांनी दिलेला शब्द कसा पाळला, हेही लाेकांना दाखवून दिले जाईल. - श्याम गोहाड, उपाध्यक्ष, मनविसे