नाशिक- गेल्या चार महिन्यांपासून नाराज असलेले मनसेचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार वसंत गिते तसेच त्यांचे कट्टर समर्थक जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्यासह शहर व जिल्ह्यातील जवळपास दोनशे पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. 3) अखेर
आपल्या पदांचे राजीनामे दिले. राज ठाकरे हे येत्या आठवड्यात नाशिक दौ-यावर येणार असताना गितेंसह महत्त्वाच्या पदाधिका-यांचे राजीनामे म्हणजे पक्षासाठी मोठे खिंडारच मानले जात आहे. दुसरीकडे, राजीनामा देणा-या पदाधिका-यांनी पक्षात सक्रिय राहाणार, असेही नमूद केल्याने हे दबावतंत्र वा स्वत:च्या शक्तीची चाचपणी तर नाही ना, अशाही चर्चेला उधाण आले होते.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाला राज ठाकरे यांनी जाहीर सभेत नाशिकच्या पदाधिका-यांना जबाबदार धरले होते. त्यानंतर नाशिकच्या बुरूजाची डागडुजी करण्यासाठी संपर्कप्रमुख म्हणून अविनाश अभ्यंकर यांची नियुक्ती झाली. अभ्यंकर यांनी पक्षसंघटनेंतर्गत खदखदणाऱ्या वादाचे परीक्षण करून राज यांच्याकडे काही निष्कर्ष सादर केले. त्यांच्या कामकाजाने दुसरीकडे ज्येष्ठ नेते गिते यांच्यासह अनेक पदाधिकारी दुखावले. त्यातून ऑगस्टमध्ये राज यांच्या दौ-याकडे गितेंनी पाठ फिरवत जाहीर नाराजी व्यक्त केली. राज यांनी तीन नेत्यांना पाठवून नाराज गितेंना पुन्हा पक्षात आणले. त्यानंतर महापौरपदाच्या निवडणुकीची सूत्रेही गितेंकडे सोपवली. मनसेचा महापौर व त्यातही गितेंच्या जवळची व्यक्ती असल्याने नाराजी संपेल असे चित्र होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत खुद्द गितेंचाच पराभव झाल्याने पक्षांतर्गत गटबाजी व अस्वस्थता उफाळून आली. त्यातून सोमवारी गिते, ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे पदाचे राजीनामे सादर केले. या पत्रात मात्र त्यांनी पक्ष संघटनेत कार्यरत राहील,असे नमूद केल्याने त्यांच्या पुढील वाटचालीविषयी तर्कवितर्क सुरू आहेत.
अतुल चांडक बाहेरगावी
अतुल चांडक यांनी मनसेच्या प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त होते. मात्र, त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण बंगळुरू येथे उपचारासाठी आलो असून, ६ नोव्हेंबर रोजी परतणार असल्याचे सांगितले. राजीनाम्याचे मात्र त्यांनी खंडन करत आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, एकूणच त्यांची देहबोली व गेल्या काही दिवसांपासूनची अस्वस्थता लक्षात घेता, ते नाराजांच्या यादीत अग्रभागी असल्याचे चित्र आहे. चांडक यांना पक्षाच्या आंदोलनासंदर्भातील जुन्या खटल्यात एक दिवस अटक करून पोलिस कोठडीत ठेवल्यानंतर मनसेच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्याची फारशी दखल घेतली नव्हती. त्याबरोबरच संपर्कप्रमुख म्हणून अभ्यंकरांची नियुक्तीही त्यांना मान्य नसल्याचे सांगितले जाते.
पुढे काय; शिवसेना, भाजप की राष्ट्रवादी काँग्रेस?
गितेंनी पक्षात सक्रिय राहणार असे सांगितले असले तरी त्यांच्यासह समर्थकांचा भाजपकडे ओढा असल्याचे समजते. गिते भाजपात गेल्यास त्यांना आमदार देवयानी फरांदे यांच्या गटाकडून विरोधाची शक्यता आहे. मध्य मतदारसंघातून शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी गितेंविरोधात िनवडणूक लढवली होती. त्यामुळे गितेंचा सेनेत समावेश झाल्यास या मतदारसंघावरील दावेदारी वाढू शकेल. माजी मंत्री भुजबळांशी जवळचे संबंध लक्षात घेता राष्ट्रवादीतील प्रवेश त्यांना अनुकूल ठरू शकेल. मात्र, सध्या राष्ट्रवादी व काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेबाहेर असल्याने वा तेथे काम करण्यास संधी नसल्याने गिते वा त्यांचे समर्थक तो रस्ता धरतील असे दिसत नाही.