आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे देणार नोकर्‍यांसाठी यशस्वितेचा मंत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - येत्या दोन महिन्यात केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारीतील सरकारी खात्यात 80 हजार पदांसाठी नोकरभरती होणार असल्यामुळे यशस्वीतेचा मंत्र देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 9 ते 23 फेब्रुवारीदरम्यान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन महोत्सव जाहीर केला आहे. यात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ परीक्षार्थींना अर्ज कसा भरायचा यापासून, तर परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याबाबत मार्गदर्शन करणार असल्याचे आमदार वसंत गिते यांनी जाहीर केले.

राजगड येथे पत्रकार परिषदेत गिते यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. गेल्या सात वर्षांपासून मनसेच्या करिअर विभागामार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन महोत्सव राबवला जात आहे. आतापर्यंत 20 हजार उमेदवारांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ झाल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मराठी टक्का वाढवण्यासाठी मनसेचा प्रयत्न असून, हा उपक्रम बघून तालुकास्तरावरही आता शिबिरांची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर 9 फेब्रुवारीपासून मार्गदर्शन महोत्सव होईल.

3 ते 8 फेब्रुवारीदरम्यान 10 ते 5 वाजेदरम्यान राजगड कार्यालयात नाव नोंदणी होईल. त्यानंतर करिअर फाउंडेशनचे आनंद मापुस्कर, आय. ए. एस. नरसिंग पवार, पोलिस उपाधीक्षक नीलेश सोनवणे, वित्त अधिकारी भाग्यर्शी जाधव, नायब तहसीलदार हंसराज पाटील मार्गदर्शन करतील. सचिन चव्हाण, राम खैरनार व डॉ. जी. आर. पाटील यांच्याकडे शिबिराचे नियोजन असेल. या वेळी सचिन ठाकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

अशी आहेत पदे
20,000 स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत
15,000 महाराष्ट्र पोलिस खाते
18561 लोको पायलट
8006 रेल्वे सेवेत तंत्रज्ञ


गेल्या वर्षी मनसेच्या करिअर महोत्सवातून मार्गदर्शन घेतलेल्या 57 तरुणांना पोलिस खात्यात नोकरी मिळाल्याचे गिते यांनी सांगितले. यात 22 मुलींचा समावेश असून, त्यांच्या फिटनेसपासून तर परीक्षेपर्यंतची तयारी करून घेण्यात आली. के. टी. एच. एम.च्या प्राध्यपाकांनी महत्त्वाचे योगदान दिले. पोलिस खात्यात नोकरीची संधी असून, तालुकास्तरावर पोलिस प्रशिक्षण देण्याचाही मनसेचा प्रयत्न आहे.