आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेच्या भूमिकेने मनसे अडचणीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राहुल ढिकले यांच्यासाठी मनसेने निवडणूक प्रतिष्ठेची केली असतानाच, भाजपनेही कराराप्रमाणे सभापतिपदासाठी दावा केला आहे. दुसरीकडे शिवसेनेने सभापतिपदावरील दावा कायम ठेवल्यामुळे मनसेसमोर दुहेरी पेच निर्माण झाला आहे. तूर्तास भाजपचे पारडे जड असल्याचे चित्र असून, मनसेला थोपवण्यासाठी शिवसेनेकडून भाजपला पाठिंबा देण्याची खेळीही खेळली जाण्याची शक्यता आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मनसे व भाजप नेत्यांत खलबते सुरू होती.
गतवेळी किंगमेकर ठरलेल्या शिवसेनेचा यंदा कराराप्रमाणे किंग बनण्याचाच प्रयत्न असेल, अशी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे मनसे व भाजपवर दबाव आला असून, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबतीने नवे समीकरण जुळवण्याची तयारीही सुरू आहे. मनसेकडे महापौरपद, भाजपकडे उपमहापौरपद असून, दुसर्‍या क्रमांकाचे संख्याबळ असल्याने यंदा स्थायी सभापतिपदासाठी सेनेने दावा केला होता. मात्र, मनसे व भाजपच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे सेनेकडूनही दोन अर्ज भरण्यात आले. अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेनेशी चर्चा न झाल्यामुळे पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी नवीन समीकरणे जुळवण्यास सुरुवात केल्याचे समजते. त्यात मनसेच टार्गेट असेल, असेही दिसते.

असे आहेत पर्याय
शिवसेना : सभापतिपद मिळवायचे असेल तर भाजपला राजी करणे अपरिहार्य आहे. राज्यस्तरीय युतीचा हवाला देऊन भाजपची मनधरणी केली तर दोघांचे संख्याबळ पाच होते. भाजप सोबत न राहिल्यास बहुमतासाठी लागणार्‍या आणखी सहा मतांसाठी महाआघाडी तयार करून राष्ट्रवादी, काँग्रेस व अपक्षांची मदत घ्यावी लागेल.

भाजप : मनसेचे पाच सदस्य असून, भाजपकडे दोन सदस्य आहेत. त्यामुळे शिवसेनेची मनधरणी करून तीन मते मिळाल्यास बहुमत मिळेल. भाजपकडे काँग्रेस-राष्ट्रवादी व अपक्षांची मदत घेण्याचा पर्याय नाही. विधानसभेच्या तोंडावर तशी खेळी होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे भाजपला सेनेची मनधरणी करावी लागेल.
मनसे : सभापतिपदावर भाजपचा दावा असल्याची बाळा नांदगावकरांनी कबुली दिली आहे. अशा स्थितीत मनसेला सभापतिपद मिळवायचे असेल तर दोन मतांची गरज भासेल. मनसेचे पाच व भाजपचे दोन सदस्य मिळून संख्या सात होते. बहुमतासाठी नऊ सदस्यांची गरज असून, अपक्षांची मदत घेतली तर सदस्यसंख्या समान होईल.

काँग्रेस आघाडी : राष्ट्रवादी व काँग्रेस या दोघांनाही एकमेव संधी आहे. एक तर नाराज शिवसेनेला मदत करायची किंवा त्यांच्या मदतीवर सभापतिपद मिळवायचे. दोन्ही पक्ष मिळून पाच सदस्य असून, सेनेच्या तिघांनी पाठिंबा दिला तर सदस्यसंख्या आठ होईल. त्याबरोबरच अपक्षांच्या एका मताच्या जोरावर सभापती करण्याचे गणित जुळवता येईल.