आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयीस्कर डोळेझाक: मनसेच्या बालेकिल्ल्यात अतिक्रमण ‘राज’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनधिकृत बांधकामे हटवण्याचे आदेश वारंवार देत असताना पक्षाचे तीन नगरसेवक असणार्‍या सिडकोत अतिक्रमणाने विळखा घातला आहे.

दत्तमंदिर स्टॉप ते त्रिमूर्ती चौक, दिव्या अँडलॅब थिएटर ते पवननगर, त्रिमूर्ती चौक, दुर्गानगर, मटाले मंगल कार्यालय, कामटवाडे रस्त्यावर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. मिठाई विक्रेत्यांनी दुकानाची जागा सोडून पाणीपुरी, भेळपुरीचा स्टॉल थाटला आहे. डेअरी, मंगल कार्यालये, बारवाल्यांनी वाहनतळावर वाढीव बांधकामे केल्याने नागरिकांना रस्त्यावरच वाहने लावावी लागतात.

हातागाडीवाले, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, वाहनबाजार, भंगार बाजार, भाजीपाला विक्रेते रस्त्यातच दुकाने थाटतात. कोणाचीही परवानगी न घेता सर्रास बांधकामे केली जात आहेत. कामटवाडे रस्त्यालगत भंगार व्यावसायिकांचे शेड उभी आहेत. मनसेच्या बहुतांश नगरसेवकांच्या निवासस्थाने, संपर्क कार्यालयांसमोर अतिक्रमणे होताना लोकप्रतिनिधींसह प्रशासनही विरोध करीत नाही.

आश्वासनांचा विसर
तक्रारी केल्यास अतिक्रमण तातडीने हटवण्याचे आश्वासन महापौरांनी दोन महिन्यांपूर्वी दौर्‍यात दिले होते. मात्र, हा दौरा आश्वासनांसाठीच होता का, असा सवाल उपस्थित होत आहे.

मानसिकताच नाही
ठिकठिकाणची अनधिकृत बांधकामे हटवण्याबाबत मनपा विभागीय अधिकार्‍यांसह अतिक्रमण विभागाकडे तक्रारी केल्या जात आहेत. व्यक्तिश: भेटूनही सूचना केल्या. मात्र, अधिकार्‍यांची मानसिकताच नसून त्यांच्याकडूनच दुर्लक्ष केले जात आहे.
-अनिल मटाले, नगरसेवक