आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे पदाधिकार्‍यासह तिघांना युवकाच्या खूनप्रकरणी अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीच्या समोरील उत्कर्षनगर येथे मागील भांडणाची कुरापत काढून धारदार शस्त्राने वार करून युवकाच्या झालेल्या खूनप्रकरणात पोलिसांनी मनसेचा पदाधिकारी किशोर तेजाळे याच्यासह तिघांना अटक केली आहे.

त्र्यंबक रस्त्यावरील वनविभागाच्या मोकळ्या मैदानात सम्राट सोशल ग्रुपच्या नावाने किशोर तेजाळे याने दांडियारासचे आयोजन केले होते. या ठिकाणी दांडिया बघण्यासाठी आलेल्या विक्रम छोटूसिंग परदेशी याच्याशी पूर्ववैमनस्यातून तिघांनी वाद घातला. भांडणाचे पर्यवसान हाणामारीत होऊन परदेशी याच्यावर शस्त्राने वार केल्याने तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शनिवारी रात्रीच्या सुमारास गंगापूर पोलिस ठाण्यात सचिन सताळे याच्या फिर्यादीनुसार तेजाळे याच्यासह शैलेश आत्माराम पवार व विकी संजय जाधव यांना अटक केली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, संशयित तेजाळे याच्याविरुद्ध यापूर्वीही गंगापूर, अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, त्र्यंबक रस्त्यावर व कॉलेजरोड भागात मनसेच्या लोकप्रतिनिधींसह प्रदेश सरचिटणीस यांच्या मोठमोठय़ा छबींसह स्वत:चे होर्डिंग्ज झळकविण्यात तेजाळे आघाडीवर होता. कुठलाही सण, उत्सव अथवा कार्यक्रम असल्यास मनसेचा पदाधिकारी असल्याच्या आविर्भावात त्याचे फलक सर्वत्र दिसतात. त्याच्या या अटकेनंतर विविध राजकीय पक्षांच्या मंडळींनी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी कारवाई सुरूच ठेवल्याने त्यांना काढता पाय घ्यावा लागला.