आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणास ठाऊक कसे.. शिवसेनेत गेले गोडसे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - हेमंत गोडसे यांनी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, संपर्कप्रमुख, उपनेत्यांना बाजूला ठेवत थेट वरिष्ठांशी संपर्क साधून पक्षप्रवेशाचा मार्ग निवडल्याने ‘कोणास ठाऊक कसे, शिवसेनेत आले गोडसे’ अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

विकासकामांमुळे लोकसभा निवडणुकीत दोन लाख मते मिळाल्याचा दावा करणार्‍या गोडसे यांना राजलाट व मनसेच्या झंझावाताचा विसर पडल्याचे बोलले जाते. त्यामुळेच महापौरपदासाठी आपलाच विचार झाला पाहिजे, असे त्यांना वाटू लागल्याचे कार्यकर्ते म्हणतात. मनसे भुजबळांसाठी सोयीचे राजकारण करत असल्याचा आरोप करताना लोकसभा पराभवानंतर मतदारसंघात संपर्क ठेवला नाही, ही गोष्ट ते विसरून गेले. लोकसभेसाठी पुन्हा विचार होणार नसल्याची खात्री झाल्यानेच त्यांनी दुसरा घरोबा शोधण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादी- कॉँग्रेसमध्ये जाऊन उपयोग नाही; संधी मिळेल ती शिवसेनेतच, असे त्यांना वाटले व लोकसभा निवडणूक लढवण्यास पुन्हा इच्छुक नसलेल्या दत्ता गायकवाडांनीही त्यांना प्रतिसाद दिला. परंतु, गायकवाडांनाही कल्पना न देता गोडसेंनी ‘मातोर्शी’ची वाट धरली.

संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, उपनेते बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना टाळत थेट वरिष्ठांकडे धाव घेणार्‍या गोडसेंना लोकसभा उमेदवारी मिळालीच तर दशरथ पाटील यांच्याप्रमाणे दगाफटक्याची शक्यता नाकारता येत नाही. गोडसेंच्या जाण्याने मनसेतील इच्छुकांचा मार्ग मोकळा झाला असला तरी शिवसेनेतील इच्छुकांचा मात्र अडला आहे. त्यामुळे शिवसेनेत त्यांचे स्वागत होण्याऐवजी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी, तयारी करणार्‍यांच्या कपाळावर आजच आठय़ा पडल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला तिसर्‍या क्रमांकावर पाठवणारा ‘मोठा मासा’ गळाला लागल्याची साधी माहिती मिर्लेकर यांना नव्हती. तर जवळच गोडसे यांचे निवासस्थान, कार्यालय असताना घोलपांना ‘कधी झाले हे’ असा प्रश्न पडला. जिल्हाप्रमुख विजय करंजकरांनी ‘कसे आले गोडसे’ असा प्रश्न विचारला.

छायाचित्र - गोडसे यांच्या डोळ्यांत तरळलेले हे अश्रू मनसे सोडण्याचा निर्णय जाहीर करण्यासाठी शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतील नाहीत. हे दृश्य आहे, 2009 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यानचे. आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मनसेमुळेच एवढा प्रतिसाद मिळतो आहे, असे वाटल्याने त्यांच्या भावना अशा दाटून आल्या नसाव्यात ?