आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या नवनिर्माणाचे पुन्हा स्वप्न, राज ठाकरे यांची महत्त्वाच्या प्रकल्पांना भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे व लोकांवर उगाच खर्चाचा बोजा टाकण्याऐवजी वर्षभरात नाशिकमध्ये चार मोठे मात्र जुनेच प्रकल्प पुन्हा पूर्णत्वास नेण्याचे काम खासगी कंपन्यांच्या मदतीने पूर्ण होईल, असा आशावाद व्यक्त करत राज ठाकरे यांनी नाशिककरांना पुन्हा नवनिर्माणाचे स्वप्न दाखवले. छोट्या कंत्राटदारांना पोसण्याच्या नादात रस्त्यांचे वाटोळे झाले असून, मुंबई, पुण्याप्रमाणे डिफर्ड पेमेंटमधून मोठ्या कंपन्यांच्या मदतीने रस्ते निर्मितीचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक दौऱ्यावरील राज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आठ महिन्यांपासून आयुक्त नसल्यामुळे नवनिर्माणाच्या कामांना ब्रेक लागला होता. शिवाजी उद्यानाच्या विकासासाठी आनंद महिंद्रा तयार होते. त्यांना विचारले की, काम का सुरू नाही तर ते म्हणाले माझी यंत्रणा सज्ज आहे. परंतु, पालिकेबरोबर करारनामा नाही. करारनामा आयुक्त नसल्याने खोळंबला. मुळात पालिकेकडे पैसे नसल्यामुळे सीएसआर (व्यावसायिक सामाजिक दायित्व उपक्रम) अ‍ॅक्टिव्हिटीतून चार मोठे प्रकल्प पूर्ण केले जातील. त्यात गोदापार्क, पांडवलेणी येथील बॉटनिकल गार्डन, पेलिकन पार्क व फाळके स्मारक यांचा समावेश असेल.
आता मुक्काम वारंवार : नाशिकच्या विकासासाठी जातीने लक्ष घातले असून कामांना वेग येईल. आता नाशिकच्या नवनिर्माणासाठी मला वारंवार यावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. मनपा निवडणुकीपूर्वी राज यांनी महिन्यातून एकदा येण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात त्यांचे दुर्लक्ष झाल्यावर त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसला. त्यामुळे आता राज हे नक्की नाशिकला येतील, असे तूर्तास चित्र आहे.
अनधिकृत अतिक्रमणांवर हातोडा : यापूर्वी शहरातील अतिक्रमणे हटवण्याची घोेषणा करणाऱ्या राज यांनी पुन्हा एकदा अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. राज यांनी आयुक्तांच्या कामाची प्रशंसा करत त्यांच्याकडून चांगले काम होऊ शकेल, असे मत व्यक्त केले. नाशिक करणार बगिचांचे शहर : निवडणुकीत राज यांनी नाशिकला बगिचांचे शहर बनविण्याचे स्वप्न दाखविले होते. त्याची पूर्तता येत्या काळात होईल असे सांगत पालकांना मुलगा घरात संगणकावर बसून असतो अशी तक्रार करण्याची जागा त्यामुळे उरणार नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले. मनसेच्या काळात शहरातील उद्यानांची जागा क्रीडांगणासाठी देण्याचा घाट घातल्याबाबत विचारले असता, त्यांनी सर्व मला माहीत नसते, असे सांगून पडदा टाकला.

यावरही बोलले राज
१. मराठी शाळांमध्ये उत्तम इंग्रजी शिकविले पाहिजे. याचा अर्थ इंग्रजी शाळा बंद करा असा नाही. मात्र, आजघडीला आंतरराष्ट्रीय असे नाव देऊन अनेक इंग्रजी शाळा सुरू आहेत. काही कळतच नाही नेमकी भानगड काय आहे?
२. नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत राज म्हणाले की, स्मारक म्हणजे नुसते पुतळे नव्हे, तर त्यातून काहीतरी शिकवण मिळेल हे बघणे महत्त्वाचे आहे. त्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय होईलच.

३. टोलनाक्याबाबत आपली जुनीच भूमिका कायम असून, दोन-पाच कोटींच्या रस्त्यांसाठी टोल लावू नये. त्याप्रमाणे कॅशएेवजी रिसीट सिस्टिमने टोल वसुली झाल्यास पारदर्शकता येईल. परदेशात अशाच पद्धतीने वसुली होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.