आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्या पुनर्बांधणीसाठी उद्यापासून बैठकांचा धडाका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विधानसभानिवडणुकीतील पराभवानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे त्यानंतर पक्षांतर्गत निर्माण झालेली बंडाळी या पार्श्वभूमीवर आता दोन दिवसांत मनसेच्या पुनर्बांधणीसाठी पुन्हा बैठकांचा फड रंगणार आहे. प्रामुख्याने पक्ष संघटनेत दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांची पुनर्बांधणी केली जाणार असून, त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देऊन नव्या जाेमाने उभे राहण्याचे आवाहन केले जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीत नाशिकच्या बालेकिल्ल्यात मनसेचा सुपडा साफ झाला. दोन्ही आमदारांचा पराभव झाल्यावर त्यातील प्रमुख असलेल्या वसंत िगते यांनी प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. गिते यांनी पक्षात राहण्याचे संकेत दिले असले तरी, त्यांची अन्य पक्षात सुरू असलेली चाचपणी लपून राहिली नाही. त्यांच्याबरोबरच जवळपास दोनशे पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे िदल्यावर आता मनसेसमोर पुनर्बांधणीचे मोठे आव्हान उभे राहिल्याचेही चित्र आहे. १८ नोव्हेंबरपासून राज ठाकरे महाराष्ट्र दाैऱ्यावर असून, या पार्श्वभूमीवर मनसे नव्याने उभे करण्याचे आव्हानही त्यांनी खांद्यावर घेतले आहे. त्यामुळे नाशिकमधील बंडाळीकडे काणाडोळा करत, नवीन बांधणीसाठी महानगरप्रमुख अॅड. राहुल ढिकले यांच्यासह पक्ष संघटनेपासून दूर असलेल्या काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी सूत्रे हाती घेतल्याचे समजते. त्यातून शहरातील विभागप्रमुखापासून, तर प्रभागप्रमुखापर्यंत सर्वांच्या बैठका येत्या दोन दिवसांत होणार आहेत.

पदोन्नतीचे संकेत
विभागप्रमुखांनीपदाला रामराम केला, तर उपविभागप्रमुखांना पदोन्नती देण्याचे संकेत आहेत. त्याप्रमाणे कनिष्ठ कार्यकर्त्यांना महत्त्वाची जबाबदारी देऊन त्यांच्या उत्साहाचा फायदा आता पक्षासाठी करून घेतला जाणार आहे. पक्षाची आक्रमक आंदोलक ही छबी जपण्याचाही प्रयत्न असेल असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
२२ला नाशिक दाैरा
१८नोव्हेंबरपासून राज ठाकरे हे महाराष्ट्र दाैऱ्यावर असून, प्रथम पुणे त्यानंतर औरंगाबाद येथील दाैऱ्यानंतर ते २२ नोव्हेंबरला नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे. दाैऱ्यात बदल झाला, तर फारतर २६ पर्यंत नाशिकचे येणे लांबू शकेल, मात्र २६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान नाशिक दाैरा होईलच असाही आशावाद पदाधिकारी व्यक्त करत आहेत.