आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुचर्चित सभेवरून मनसे-राष्ट्रवादीत रंगणार कलगीतुरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राष्ट्रवादीच्या नेत्यांवर शरसंधान साधत मनसेने भाजपशी युती करून महापालिकेवर झेंडा फडकवला खरा; परंतु हे वैर आता मनसेच्या अंगाशी आले आहे. या निवडणुकीनंतर जेथे- जेथे संधी मिळेल, त्याचे सोने करीत राष्ट्रवादीचे नगरसेवक मनसेला नामोहरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता तर राज ठाकरे यांच्या दीड वर्षापूर्वी झालेल्या बहुचर्चित सभेला ‘फायनान्स’ करणार्‍यांची नावे जाहीर करण्याची तयारी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी केली आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी आणि मनसेमधील कलगीतुरा अधिक रंगण्याची शक्यता आहे.

पालिका निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अंतिम टप्प्यात जाहीर सभा घेऊन त्यात पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ठाकरे यांच्या या भाषणाचा प्रभाव नाशिककरांवर पडून त्याचे रूपांतर मनसेच्या 40 जागा निवडून येण्यावर झाला. त्यानंतर भाजपशी हातमिळवणी करीत मनसेने सत्ताग्रहण केले. मात्र, राज यांच्या सभेची चर्चा निवडणुकीनंतरही सुरू राहिल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांना ही बाब प्रचंड जिव्हारी लागली आहे. म्हणूनच प्रत्येक पावलागणिक मनसेला कोंडीत पकडण्याची खेळी राष्ट्रवादीकडून होत असून, त्यात यशही लाभत आहे. जकात वसुलीचे खासगीकरण रद्द करण्याच्या मुद्यावरून प्रारंभी राष्ट्रवादीने मनसेवर तोंडसुख घेतले होते. त्यानंतर महासभेत सादर बहुसंख्य प्रस्तावांवर आक्षेप घेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मनसेला खिंडीत पकडले.

मधल्या काळात राष्ट्रवादीच्या विरोधाची धार बोथट झाल्यावर थेट गटनेताच बदलून भुजबळ यांनी आपल्या नगरसेवकांना विरोधाचे ‘टॉनिक’ पाजले. विकास आराखड्याच्या मुद्यावर हे टॉनिक राष्ट्रवादीला कामी आले. या आराखड्याच्या कर्त्याधर्त्या अधिकार्‍याची नियुक्ती खासदार समीर भुजबळ यांच्या शिफारशीवरून झाल्याचा आरोप महापौरांनी केल्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक महासभेत मनसेवर तुटून पडले. काहींनी तर राज ठाकरे यांचीच ‘मिमिक्री’ करीत ‘मराठी माणसांच्या न्याय हक्का’ची जाणीव करून दिली. भुजबळांच्या नामोल्लेख टाळून ‘बाप हा बापच असतो’ असे सांगत मनसेला खिजवण्याचाही प्रयत्न या महासभेत झाला.

प्रचार सभेचा ‘सातबारा उतारा’च राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी काढला
ज्या सभेच्या जोरावर महापालिका निवडणुकीत मनसेने मुसंडी मारली, त्या 12 फेब्रुवारी 2012 च्या सभेचा ‘सातबारा उताराच’ राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी काढला आहे. या सभेत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. नाशिक शहराचा विकास आराखडा काही बांधकाम व्यावसायिकांच्या इशार्‍यावर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या बांधकाम व्यावसायिकांनीच 12 फेब्रुवारीच्या सभेसाठी पैसे पुरविल्याचा शोध राष्ट्रवादीने लावला आहे. याविषयी लवकरच पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्याच्या तयारीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत.

राजकारण
राज ठाकरे यांच्या दीड वर्षापूर्वी झालेल्या सभेचे उट्टे काढण्यात राष्ट्रवादी काँग्रेस मश्गुल; फायनान्स करणार्‍यांच्या नावासह लवकरच गौप्यस्फोट