आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेचे आता नवे मिशन ऑपरेशन नाशिक क्लीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेस, शिवसेनेकडून मनसेवर हल्ला होत असताना आता पंधरा दिवसांत ‘ऑपरेशन नाशिक क्लीन’सारखी मोहीम राबवून पक्षाची प्रतिमा सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. थेट डांबराने खड्डे बुजवणे, घंटागाडीवर नजर ठेवणे व स्वच्छता निरीक्षकांपासून तर कर्मचार्‍यांची झाडझडती घेण्याची जबाबदारी नगरसेवकांवर सोपवली आहे.

मनसे आमदार वसंत गिते यांनी नाशिक-पूर्व, पंचवटी प्रभागातील नगरसेवक अधिकार्‍यांची बैठक घेतली. महापौर हे देवदर्शनासाठी गेल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत उपमहापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी नगरसेवकांना आगामी पंधरा दिवसांसाठी कसे काम करायचे, याच्या सूचना देण्यात आल्या. प्रामुख्याने खड्डय़ांमुळे मनसे-भाजपला लक्ष्य केले जात असल्याचे बघता, 45 लाख रुपयांच्या निधीतून थेट खड्डे बुजविण्यासाठी डांबराचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागात पाच ते सहा लाख रुपयांचा निधी देऊन कोलड्रॅम ठेवले जाणार आहेत. मोहिमेची सुरुवात करण्यासाठी पंचवटी, जुने नाशिक, नाशिकरोड प्रभागात बैठका झाल्या असून, सिडको व सातपूर प्रभागाची शनिवारी बैठक होणार आहे.

आठवडाभरात दोन प्रभागांवर ‘प्रयोग’

प्रत्येक विभागातील दोन प्रभाग निवडून येथे पहाटेपासून नगरसेवकांना तैनात केले जाणार आहे. सात दिवसांचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर पॅटर्नमधील त्रुटी दूर करून पंधरा दिवसांत संपूर्ण नाशिकमधील प्रभाग पिंजून काढले जातील. सकाळी स्वच्छता निरीक्षक, दुपारी मुकादम व सायंकाळी विभागीय अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली खड्डे भरून घेण्यापासून तर सफाईची कामे केली जाणार आहेत. खासकरून घंटागाड्यांकडे विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असून, घंटागाडी किती वाजता येते, व कोठे फिरते, याचा नगरसेवकांनी जातीने पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचनाही गिते यांनी केल्या आहेत.

अधिकारी धारेवर

नाशिक । शहरातील रस्ते आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्यास प्रशासनाचे अधिकारीच जबाबदार असून, पंधरा दिवसांत शहरातील खड्डे दुरुस्त करण्याचे आदेश आमदार वसंत गिते यांनी दिले. पंचवटी विभागीय कार्यालयात सभापती आणि अधिकार्‍यांची त्यांनी अचानक बैठक घेतली.

पंचवटी प्रभागातील रस्ते आणि आरोग्याच्या प्रश्नावर सभापती लता टिळे यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. शुक्रवारी आमदार वसंत गिते यांनी अचानक पंचवटी प्रभाग येथे भेट देऊन तातडीची बैठक घेतली. अधिकार्‍यांच्या दुर्लक्षाचा राग सत्ताधार्‍यांवर व्यक्त होत आहे. प्रभागातील रस्ते आणि आरोग्याचा प्रश्नांवर अधिकार्‍यांनी विशेष लक्ष द्यावे; अन्यथा कारवाईस सामोरे जावे, असा इशारा गिते यांनी दिला. घंटागाड्यांच्या फेर्‍या वाढवाव्यात, कचरा रोज उचलला जावा, डासप्रतिबंधक औषधांची फवारणी करावी आदी समस्यांबाबत त्यांनी अधिकार्‍यांना सूचना दिल्या.