आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासाचा धावा, मनसेचा ‘कावा’ टीका आयुक्तांवर, खुलासा मात्र महापौरांचा..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विकासकामांसह पाच लाखांपर्यंतच्या किरकोळ कामांच्या फायली तुंबल्याने अस्वस्थ असलेल्या मनसेच्या नगरसेवकांनी बुधवारी गनिमी काव्याने महापालिकेवर हल्ला बोल केला. दोन्ही प्रवेशद्वारे बंद करत भर पावसात अधिकारी व कर्मचार्‍यांना रोखून धरले. ‘मुख्यमंत्री हाय हाय’, ‘पूर्ण वेळ आयुक्त कधी मिळणार’ अशी घोषणाबाजीही करण्यात आली.

महापालिकेचे अंदाजपत्रक यंदा उशिरा मंजूर झाले. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तीन महिने कामकाज ठप्प झाले होते. त्यातच, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिताही महिनाभरात लागण्याची शक्यता असताना अनेक महत्त्वाच्या कामांच्या निविदाच निघालेल्या नाहीत. छोट्या कामांच्या फाइलही प्रभारी आयुक्त निकाली काढत नसल्यामुळे नगरसेवक अस्वस्थ आहेत. यावरून महासभेत आंदोलनही झाले. गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रवेशद्वारावर निदर्शने केली. सत्ताधारी नगरसेवकांचाही संयम बुधवारी संपला व त्यांनी सकाळी 10च्या सुमारासच अचानक महापालिकेचे प्रवेशद्वार बंद केले. कामाची वेळ झालेली आणि त्यात पाऊस यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांची लगबग सुरू असताना प्रवेशद्वारच बंद झाल्यामुळे त्यांचे हाल झाले. दुसरीकडे, मनसेच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ‘प्रभारी आयुक्तांनीच प्रवेशद्वारावर यावे’, अशी मागणीही सुरू झाली.
मुख्यमंत्र्यांकडून राजकारण
पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असून, चार महिन्यांपासून पूर्णवेळ आयुक्त नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पूर्णवेळ आयुक्ताची मागणी केली. मात्र, निर्णयातील दिरंगाई पाहता राजकारण होत असल्याची शंका येते. आता महसूल आयुक्तांनाच यासंदर्भात साकडे घालणार आहोत. अँड. यतिन वाघ, महापौर

मनसेला बदनाम करण्याचा प्रयत्न
महापालिकेची सत्ता मनसेकडे असल्यामुळे राज्यशासन बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. आयुक्तांची नेमणूक न करणे, एलबीटी रद्द करण्याचा निर्णय न घेणे असे धोरण राबवले जात आहे. शहरात गोंधळ उडवण्याचा हा प्रयत्न असून, प्रभागांतील कामे रोखण्यावरच शासनाचा भर आहे. शशिकांत जाधव, सभागृहनेते

आंदोलकांमध्ये विसंवाद
मनसेच्या नगरसेवकांनी आंदोलन करून संघटनेची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला खरा; मात्र त्यात नियोजन नसल्याचेही समोर आले. काही नगरसेवकांनी कर्मचार्‍यांसह पत्रकारांनाही आत जाण्यास मनाई केली. त्यावेळी महापौर हे स्थायी समिती सभापती व सभागृहनेत्यांसह आयुक्तांकडे चर्चेसाठी गेले होते. सुजाता डेरे यांनी ‘कर्मचार्‍यांबरोबर आपल्याला काम करायचेय, त्यांना सोडा’, असे ओरडून सांगितल्यानंतरही नगरसेवक ऐकण्यास तयार नव्हते.

आमदार अंधारात, आंदोलनापासूनही दूर
पूर्णवेळ आयुक्त नेमण्याची बाब राज्य शासनाच्या अखत्यारीत असल्यामुळे मनसेच्या आमदारांबरोबर घेऊन आंदोलन करणे गरजेचे होते. तसे काही नगरसेवकांनी सांगूनही पाहिल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात आंदोलनात केवळ नगरसेवकच दिसले. राहुल ढिकले यांनी महानगरप्रमुख या नात्याने पुढाकार घेतला; मात्र आमदार वसंत गिते दिसले नाहीत. त्यांची परवानगी घेऊन आंदोलन केल्याचे नगरसेवक सांगत होते, तर आमदार नितीन भोसले यांना याविषयी कल्पनाच दिली गेली नाही. आंदोलन झाल्यानंतरच त्यांना याबाबत समजले.
नगरसेवकांचे आंदोलन संपल्यानंतर कार्यालयाबाहेर ताटकळलेले अधिकारी, कर्मचारी पालिकेत प्रवेश करते झाले. आयुक्तांऐवजी महापौरच खुलासा करीत असल्याचे खटकल्यानंतर तशी जाणीव सुजाता डेरे यांना करून द्यावी लागली.
मुख्य दरवाजालाच असे कुलूप लावण्यात आले.
महापौर आंदोलनात सहभागी होतील, ही नगरसेवकांची अपेक्षा फोल ठरवत वाघ निघून गेले.
कुंभमेळ्याच्या कामांनाही दिरंगाईचा फटका बसत असल्याने जोरदार घोषणाबाजी करीत मनसे नगरसेवकांनी पालिकेच्या पायर्‍यांवर ठिय्या दिला.
‘पैसेच नाहीत तर फायली निकाली काढू कशा?’
आयुक्त संजीवकुमार यांनी महत्त्वाच्या फायली निकाली निघाल्याचा दावा करतानाच, ‘पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असून, पैसेच नसल्याने फायली निकाली काढणार कशा’, असा प्रतिप्रश्न केला. महसूल घटल्याची कबुलीही त्यांनी दिली. स्थायी समितीवर महत्त्वाची प्राकलने मंजुरीसाठी असून, लवकरच सर्व फायली निकाली निघतील, असा दिलासाही त्यांनी दिला.
कुंभमेळ्यासह अन्य विकासकामांच्या फायली रखडल्याने केली महापालिकेची दारे बंद