आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Play Politics In Favor Of Bhujabal; Allagation Of Hemant Godse

मनसेचे राजकारण भुजबळांच्या सोयीचे; हेमंत गोडसेंचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लोकसभा निवडणूक छगन भुजबळांना सोयीची व्हावी अशी व्यूहरचना करणा-या महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिक-यांची एकाधिकारशाही, घरगड्यासारखी मिळणारी वागणूक,पदापासून वंचित ठेवणे व सततचा अपमान याला कंटाळून येथील नगरसेवक हेमंत गोडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे गोडसे
यांनी जाहीर केले आहे.

मनसेच्या स्थापनेपासून निष्ठेने पक्षवाढीसाठी काम केले.उत्तर महाराष्‍ट्रातून एकमेव जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर एकलहरे गटात केलेल्या आदर्श विकास कामांची पावती म्हणून लोकसभेची उमेदवारी दिली. केवळ 12 नगरसेवक असताना विकासकामे, मित्र, नातेवाइकांच्या पाठिंब्यावर भुजबळांसारख्या बलाढ्य उमेदवाराविरुद्ध पक्षाच्या राज्यातील 12 उमेदवारांमध्ये सर्वाधिक 2 लाख 16 हजार मते मिळाली. अल्पशा मतांनी पराभूत झालो. मनपातील विजयानंतर जिल्ह्यावर विशिष्ट समाजाचे नेतृत्व असावे म्हणून राज ठाकरेंची दिशाभूल करून मला महापौरपदावरून डावलले. स्थायी समिती सभापतिपदाचा अर्ज भरल्यानंतर माघार घेण्यास भाग पाडले. अशा अपमानास्पद वागणुकीला कंटाळून पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे गोडसे यांनी सांगितले. गोडसे यांच्या आरोपावर मनसे प्रमुख राज ठाकरे काय बोलतात याकडे नाशिक आणि राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा बदल असल्याचे बोलले जात आहे.

राजीनामा नाही
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदेश दिल्यास नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याची तयारी आहे मात्र मतदारांवर निवडणूक लादली जाऊ नये म्हणून राजीनामा देणार नाही. शिवसेनेत कुठल्याही पद, उमेदवारीसाठी प्रवेश करत नसून साधा शिवसैनिक म्हणून कामाची तयारी असल्याचे गोडसे यांनी सांगितले.