आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Purposfully Held Anti Toll Agitation, Chhagan Bhugbal Critised

मनसे डब्यात चालल्याने उभारी आणण्यासाठी आंदोलन,छगन भुजबळांचा टोला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला - मनसे हा पक्ष सध्या डब्यात चालला होता, त्यामुळे समोर निवडणुका बघून पक्षाला उभारी देण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे. त्यांचे टोलविरोधातील आंदोलन म्हणजे निव्वळ राजकीय स्टंटबाजी असल्याचा टोला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. टोल वसुलीत असलेल्या चुका दाखवून द्या, त्या सुधारण्याचीही आपली तयारी असल्याची ग्वाही बुधवारी त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.


राज्यात मनसेचे टोलवसुलीविरोधात आंदोलन सुरू असताना भुजबळ मुंबईहून हेलिकॉप्टरने थेट येवल्यात दाखल झाले. माजी उपनगराध्यक्ष परेश पटेल यांचे रविवारी निधन झाल्याने त्यांच्या घरी भेट देत त्यांनी पटेल कुटुंबीयांचे सांत्वन केले. मुक्तिभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पुण्यातील सभेत राज ठाकरे जे बोलले ते पूर्णपणे चुकीच्या माहितीवर आधारित आहे. टोलवसुलीचा अभ्यास असलेल्या तज्ज्ञांना घेऊन त्यांनी चर्चेसाठी यावे, कुठे चुकत असेल तर सुधारणा करायचीही आमची तयारी आहे. एकूण 63 टोलनाके आम्ही दीड वर्षांपूर्वीच बंद केले असून, आणखी काही अनावश्यक असतील तर अभ्यास करू; परंतु केवळ निवडणुकांसाठी स्टंटबाजी करायची, मला अटक करून दाखवा, असा आव आणायचा हे चुकीचे आहे.