आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे-राष्ट्रवादीमुळे ठेकेदार अस्वस्थ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिंहस्थासाठी महापालिकेने 1050 कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी शासनाने पाठवलेले पत्र व त्यानंतर महापौरांनी शासनाच्या कोर्टात टोलवलेला चेंडू, या कुरघोडीमुळे ठेकेदार अस्वस्थ झाले असून, दिवाळीपूर्वी निधी मिळाला नाही, तर कामे ठप्प होण्याची भीती अधिकार्‍यांमधून व्यक्त होत आहे. आधीच उत्पन्न कमी असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याची चालू महिन्यातही 40 कोटींची बिले रखडल्याने ठेकेदारांच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याचे अधिकारी व्यक्त करीत आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेला एक हजार कोटी रुपयांचा हिस्सा उभारावा लागणार असून, तीनशे कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीस मान्यता मिळाली असली, तरी अद्याप सातशे कोटी कसे उभारायचे, असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला आहे. एलबीटीमुळे उत्पन्न 250 कोटी रुपयांनी घटले असताना सातशे कोटींसाठी शासनाने अर्थसहाय्य करावे, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली आहे. मात्र, पालकमंत्र्यांनी केवळ एकट्यानेच नव्हे, तर सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सांगत महापालिकेनेही आर्थिक जुळवाजुळव करावी, असा प्रस्ताव ठेवला आहे. दरम्यान, महापौर वाघ यांनी मात्र स्वनिधीतील कामांचेच प्रस्ताव निधीअभावी पडून असल्याचे सांगितल्यामुळे आता 700 कोटी उभारणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मनसे व राष्ट्रवादीतील वितुष्ट-वाद जाहीर असल्यामुळे दोघांकडून एकमेकांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न होतील, अशी भीती अधिकारी व्यक्त करीत आहेत. सद्य:स्थितीत महापालिकेकडून साडेचारशे कोटी रुपयांची कामे सुरू असून, आधीच पहिल्या टप्प्यातील कामांची देयके रखडली आहेत. बांधकाम खात्याच्या एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 40 कोटी रुपयांची देयके प्रलंबित असून, दर महिन्याला अशीच परिस्थिती असल्यामुळे ठेकेदारांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. दिवाळीपर्यंत जवळपास निम्मे काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदारांची देयकांसाठी रीघ लागेल व अशा परिस्थितीत शासनाकडून सातशे कोटींबाबत तोडगा न निघाल्यास कामे ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.

केंद्र-राज्य सरकारमध्ये समन्वय महत्त्वाचा
सिंहस्थ कुंभमेळा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी नाही. त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन या दोघांनीही समसमान हिस्सा उचलून निधी दिला पाहिजे. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असूनही मोठय़ा प्रमाणात कामे सुरूच आहेत. अँड. यतिन वाघ, महापौर

पंतप्रधानांच्या भेटीचा उपमहापौरांना विसर
केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर जास्त निधी मिळवण्यासाठी पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची घोषणा उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी केली होती. मात्र, उपमहापौरांना या घोषणेचा विसर पडला असून, याबाबत माहिती नसल्याचे सांगत मनसेने स्वतंत्रपणे पाठपुराव्याची तयारी केली आहे. दुसरीकडे शिवसेनेने मात्र नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे यांच्यासमवेत अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे.