आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mns Ready For Coporation Shikshan Mandal Election

वचपा काढण्यासाठी मनसे सरसावली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापालिकेच्या शिक्षण मंडळ निवडणुकीसाठी आता नव्याने मोर्चेबांधणी सुरू झाली असून, सत्ताधारी मनसेचे लक्ष शिवसेनेच्या भूमिकेकडे लागून आहे. महाआघाडीत फूट पाडून शिक्षण मंडळासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी शिवसेनेला बरोबर घेऊन महासभा आणि स्थायी सभांमधील राजकारण खेळण्याचा मनसुबा मनसेने बांधलेला आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील कडवटपणा कमी झाल्यामुळे महाआघाडीच्या धुरिणांना देखील मनसे-शिवसेनेत मेतकूट जमण्याची धास्ती वाटत आहे. ती खरी ठरण्याची चिन्हे आहेत. स्थायीचा वचपा काढण्यासाठी मनसे सरसावली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर ताज्या घडामोडींनुसार शिवसेनेची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेनेचे मन वळविण्यासाठी मनसेने जोरदार प्रयत्न सुरू केले असून, विधान परिषद निवडणुकीत केलेल्या मदतीची परतफेड करावी, म्हणून मनसेने शिवसेनेच्या वरिष्ठांना गळ घातली आहे. शिवसेनेकडूनही त्यास दुजोरा देत स्थायी समितीसाठी स्थापन केलेल्या महाआघाडीतून बाहेर पडण्याचाच जवळपास निर्णय घेतला आहे. भाजपने महापौर निवडणुकीप्रमाणेच आपले धोरण ठेवत कॉँग्रेसला विरोध दर्शविला आहे; तर या निवडणुकीतील मनसेचा प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसने कॉँग्रेस आणि अपक्षावर आपली आशा कायम ठेवत महाआघाडीतील शिवसेनेलाही साद घातली आहे. यामुळे या निवडणुकीत शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने शिवसेनेच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.
राजकीय नेते म्हणतात- महाआघाडी जायचे की मनसेबरोबर जायचे याबाबत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हेच निर्णय घेणार आहेत. मात्र, सद्यस्थितीत महाआघाडी आणि मनसे अशा दोन्हीकडून बोलविणे सुरू असल्याचे शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले. तर कॉँग्रेससोडून अन्य कुणाबरोबरही जाण्याची तयारी भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली. तथापि, कॉँग्रेस व अपक्ष आपल्याबरोबर असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद कोशिरे यांनी केला आहे.
30 ऑगस्टला निवडणूक - महापौर यतिन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी शिक्षण मंडळाच्या निवडणुकीसाठी महासभा बोलविण्यात आली होती. मात्र, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे निधन झाल्याने सभेत त्यांना र्शद्धांजली अर्पण करण्यात आली. यामुळे आता 30 ऑगस्टला सभा घेण्याचे महापौर वाघ यांनी जाहीर करत सभा तहकूब केली. त्याचप्रमाणे स्वीकृत नगरसेवक, महिला व बालकल्याण समिती आणि वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांची निवड करण्यासाठी येत्या 23 ऑगस्ट रोजी महासभा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.